नगरपंचायतची विकासकामे रुळावर कधी येणार? समस्यांमुळे नागरिक त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 17:01 IST2024-08-28T17:01:05+5:302024-08-28T17:01:56+5:30
Gondia : तब्बल तीन वर्षांनंतर मिळाले मुख्याधिकारी

When will the development works of Nagar Panchayat come on track? Citizens suffer due to problems
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : मागील दोन ल दोन वर्षांपासून ना पदाधिकारी ना मुख्याधिकारी, अशी अवस्था असलेली येथील नगरपंचायत नेहमी विविध समस्यांसाठी चर्चेत राहिली आहे. नियमित मुख्याधिकारी नसल्याने येथे विकासकामांवर सतत फटका बसत आहे. आता तब्बल तीन वर्षांनंतर मुख्याधिकारी लाभले असून, ते नियमित राहील का आणि विकासकामे होतील का, असा प्रश्न शहरवासी करीत आहेत.
सालेकसा नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर अनेक वर्षे नगरपंचायतवर प्रशासक नियुक्त करण्यात आले. मात्र, त्यानंतर मुख्याधिकारी म्हणून आशिष चौहान दोन वर्षे राहिले. फक्त एकदा निवडणुकीतून कारभार सांभाळणाऱ्या पदाधिकाऱ्यांना इतरांशी समन्वय साधून ठेवण्यात अपयश आले होते. पक्ष-विपक्ष संघर्षाचा दाह मुख्याधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला व मुख्याधिकारी येथून सोडून गेले. त्यानंतर मागील दोन वर्षांहून अधिक काळ नगरपंचायतमध्ये ना पूर्णवेळ मुख्याधिकारी ना पदाधिकारी असून, संपूर्ण कामकाज प्रशासकाकडून केले जात होते. यामुळे येथील नागरिक त्रस्त आहेत.
नगरपंचायत क्षेत्रातील विकासकामांवर परिणाम होत असल्याची चर्चा होती. मात्र, प्रमोद कांबळे यांची प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सालेकसा नगरपंचायतच्या पूर्णवेळ मुख्याधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, तेही या नगरपंचायतमध्ये परीविक्षाधीन कालावधीमध्ये आले आहेत. त्यांचा परीविक्षाधीन काळ संपल्यानंतर ते येथे राहणार की नाही, हे अजून सांगता येत नाही. त्यामुळे सालेकसा नगरपंचायत विकासाच्या रुळावर येणार का? किंवा नेहमीप्रमाणे चलती का नाम गाडी असेच चालेल, अशी चर्चा आहे.