बुधवारपर्यंत वैनगंगा नदीला पाणी येणार; एक दिवसआड होणार पाणीपुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 16:23 IST2025-05-09T16:22:02+5:302025-05-09T16:23:47+5:30
पुजारीटोलाचे पाणी सोडले : वैनगंगा नदीत मोजकाच पाणीसाठा

Water will be available in Wainganga River by Wednesday; Water supply will be done every other day
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वैनगंगा नदीत मोजकाच पाणीसाठा असल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पाच दलघमी पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार, पाटबंधारे विभागाकडून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले असून तेच पाणी नदीपर्यंत पोहचविले जाणार आहे. अशात येत्या १३ किवा १४ तारखेपर्यंत वैनगंगा नदीत पाणी पोहचणार, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे आणखी काही दिवस पाण्याची सोय होणार आहे.
गोंदिया शहरासह लगतच्या ग्राम कटंगी व कुडवा या दोन गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या ग्राम डांगोरली येथील वैनगंगा नदीत आजघडीला मोजकाच पाणीसाठा आहे. जेमतेम १० दिवस पुरणार एवढाच पाणीसाठा असल्याने स्थिती कठीण आहे. पाटबंधारे विभागाकडून २५ एप्रिल रोजी पाच दलघमी पाणी सोडण्यात आले होते. मात्र पाणी चोरी व बंधाऱ्यांमध्ये पाणी अडून पडल्यामुळे नदीत पुरेशा प्रमाणात पाणी पोहचले नाही. अशात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून आणखी पाच दलघमी पाणी सोडण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली होती. त्यानुसार, पाटबंधारे विभागाकडून सध्या शेतीसाठी सोडण्यात आलेले पाणी बनाथर येथील कालवा बंद केल्यानंतर नदीत पोहचणार आहे. यामुळे १३ किवा १४ तारखेपर्यंत नदीत पाणी येणार, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
नदीत सध्या जेमतेम १० दिवस पुरणार एवढाच पाणीसाठा असून जून महिन्यापर्यंत पाण्याची समस्या भेडसावणार आहे. अशात जास्तीत जास्त पाण्याची गरज भासणार असून पाण्याचा योग्य वापर करावा लागणार आहे. अन्यथा दोन महिने पाण्याचा पुरवठा करणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला जड जाणार आहे.
पाटबंधारे विभागाने लावली कर्मचाऱ्यांची ड्यूटी
२५ एप्रिल रोजी पाटबंधारे विभागाने पाच दलघमी पाणी सोडले होते. मात्र कित्येक ठिकाणी कालवा फोडून पाणी चोरण्यात आले. तर बंधाऱ्यात अडकडूनही पाणी नदीत योग्य त्या प्रमाणात पोहचू शकले नाही. यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने पाणी सोडून ते पोहचविण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाची राहणार असे पत्र पाटबंधारे विभाग व जिल्हाधिकाऱ्यांना दिल होते. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत पाटबंधारे विभागाला तसे निर्देश दिले. त्याची दखल घेत पाटबंधारे विभागाने आता कालव्यांवर अभियंते व कालवा निरीक्षकांची ड्यूटी लावली आहे. आता कालवे फोडणे, पाणी चोरने आदी प्रकार बघणार आहे.
एक दिवसआड होणार पाणीपुरवठा
सध्या वैनगंगा नदीत ८-१० दिवस पुरणार एवढाच पाणीसाठा आहे. तर आता मे महिना जेमतेम सुरू झाला असून जून महिनाभरही पाण्याचा पुरवठा करावा लागणार आहे. तरीही पाणी टंचाई स्थिती बघता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून एक दिवसआड पाणीपुरवठा केला जात आहे. पावसाचे पाणी येतपर्यंत अशीच स्थिती राहणार असून यामुळेच एक दिवस पाणीपुरवठा केला जाणार आहे.
पाण्याचा योग्य वापर करा
वैनगंगा नदीत मोजकाच पाणीसाठा असून एक दिवसआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. पावसाचे पाणी नदीत पोहचेपर्यंत तरी अशाच प्रकारे एक दिवसआड पाणीपुरवठा केला जणार आहे. यावरून पाण्यासाठी किती भटकंती करावी लागते व पाणी किती गरजेचे आहे, हे दिसून येते. यामुळेच नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून करण्यात आले आहे.