गोंदियात पाइपलाइन लिकेजमुळे ४८ गावांचा पाणीपुरवठा ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 14:33 IST2025-02-24T14:30:48+5:302025-02-24T14:33:16+5:30
भर उन्हाळ्यात कसे होणार : देखभाल दुरुस्ती करणाऱ्या कंपनीचे देयक थकले

Water supply to 48 villages disrupted due to pipeline leakage in Gondia
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आमगाव-सालेकसा तालुक्यातील ४८ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा पाणी पुरवठा शनिवारपासून (दि.२२) पाइपलाइन लिकेज झाल्याने ठप्प झाला आहे. त्यामुळे या ४८ गावांतील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणावरील रुंगाटोला येथे उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत आमगाव व सालेकसा तालुक्यातील ४८ गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र कधी वीज पुरवठा खंडित तर कधी पाइपलाइन लिकेज झाल्याच्या कारणावरून अनेकदा पाणी पुरवठा ठप्प असतो. त्यामुळे या योजनेअंतर्गत पाणी पुरवठा करणारी पाइपलाइन दोन ठिकाणी लिकेज झाली आहे. हे लिकेज मोठे असल्याने शनिवारपासून या योजनेचा पाणी पुरवठा ठप्प करण्यात आला आहे. पाइपलाइन लिकेज दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर या योजनेचा पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे. या योजनेवर अवलंबून असणाऱ्या पाण्यासाठी भटकंती करावी लागेल.
आमगाव येथील जुन्या योजनेमुळे होतेय मदत
आमगाव शहरात जुनी पाणी पुरवठा योजना अद्यापही कार्यरत आहे. या योजनेअंतर्गत काही भागाला पाणी पुरवठा करण्यात येतो. बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद असल्याने आमगाव शहरवासीयांना जुन्या योजनेची मोठी मदत होत आहे.
उन्हाळ्यात कसे होणार ?
बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कधी थकीत वीज बिलामुळे तर कधी पाइपलाइन लिकेजमुळे ठप्प होतो. ही आता नेहमीचीच समस्या झाली आहे. तर योजनेची पाइपलाइनसुद्धा जीर्ण झाली असून ती दुरुस्तीकडे जि. प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात काय होणार अशी चिंता आतापासूनच या योजनेवर अवलंबून असणाऱ्या नागरिकांना सतावत आहे.
देखभाल दुरुस्ती करणाऱ्या कंपनीचे देयक थकले
- बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी जि. प. अंतर्गत एका खासगी कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.
- या कंपनीने देखभाल दुरुस्तीचे देयके गेल्या अनेक महिन्यांपासून थकले असल्याने या कंपनीने देखभाल दुरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याची माहिती आहे.
- मात्र याचा फटका बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या ४८ गावांतील नागरिकांना सहन करावा लागत आहे.
"पुजारीटोला धरणावरून रुंगाटोला येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी वाहून नेणाऱ्या पाइपलाइनला दोन ठिकाणी लिकेज झाले आहे. हे लिकेज मोठे असल्याने ते दुरुस्तीचे काम सध्या युद्धापातळीवर सुरू असून योजनेचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. काम पूर्ण होताच पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल."
- राजेंद्र सतदेवे, उपविभागीय उपअभियंता, जि. प. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग.