जिल्ह्यातील तब्बल ५२ हजार हेक्टरमधील धानपिकांवर अवकाळी संकट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 17:05 IST2025-04-04T17:04:42+5:302025-04-04T17:05:26+5:30
धान व भाजीपाला उत्पादक चिंतित : वादळी वाऱ्यासह तुरळक पावसाची हजेरी

Unseasonal crisis hits paddy crops in 52 thousand hectares of the district
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात सर्वत्र गुरुवारी (दि.३) सकाळी वादळी वाऱ्यासह तुरळक स्वरूपात पावसाची हजेरी लावली, तर दिवसभर ढगाळ वातावरण कायम होते. हवामान विभागाने पुढील दोन दिवस जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे रब्बीतील ५२ हजार हेक्टरमधील धान आणि भाजीपाला पिकांवर अवकाळीचे संकट कायम असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
हवामान विभागाने जिल्ह्यात गुरुवार ते शनिवारी दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज खरा ठरला. गुरुवारी सकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. तर दिवसभर ढगाळ वातावरण कायम होते. त्यामुळे अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. जिल्ह्यात यंदा ४६ हजार हेक्टरवर रब्बी धान व सहा हजार हेक्टरवर भाजीपाला व इतर पिकांची लागवड केली आहे. रब्बीतील धानपीक सध्या गर्भावस्थेत आहे, तर भाजीपाला पिकासाठी सुद्धा अनुकूल वातावरण असल्याने भाजीपाल्याचे पीक चांगले आहे. मात्र अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला पिकावर किडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तर वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा धानपिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे तोंडचा घासतर अवकाळीमुळे हिरावला जाणार नाही अशी चिंता शेतकऱ्यांना सतावित आहे.
अशी घ्या काळजी
वादळी वारे, पावसात झाडाखाली थांबू नये, विजा चमकताना विद्युत उपकरणांचा वापर करू नये, शेतकऱ्यांनी शेतात माल असेल तर तो सुरक्षित ठिकाणी हलवावा, जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधावे. पावसात काही नुकसान झाले असेल तर तत्काळ प्रशासनाशी संपर्क साधून माहिती द्यावी.
पुढील दोन दिवस येलो अलर्ट
जिल्ह्यात शुक्रवारी आणि शनिवारी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता असून, हवामान विभागाने पुढील दोन दिवस जिल्ह्यात येलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
विजा चमकत असतील तर जमिनीशी कमी संपर्क ठेवा
विजा चमकत असताना आपण मोकळ्या जागेत असाल तर सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने कान झाकावेत. आपले डोके दोन्ही गुडघ्यांमध्ये झाकून जमिनीशी कमीत कमी संपर्क ठेवावा. लोंबकळणाऱ्या, लटकणाऱ्या तारांपासूनही दूर राहावे.