दोन दुचाकींची समोरासमोर धडक; १ ठार, तीन युवक गंभीर जखमी
By अंकुश गुंडावार | Updated: July 10, 2023 17:40 IST2023-07-10T17:38:18+5:302023-07-10T17:40:42+5:30
शहरातील उड्डाणपुलावरील घटना : पिंडकेपार येथील युवकाचा मृत्यू

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; १ ठार, तीन युवक गंभीर जखमी
गोंदिया : दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीस्वार एका युवकाचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर तीन युवक गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि.१०) दुपारी २:३० वाजेच्या सुमारास शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील उड्डाणपुलावर घडली. सचिन जीवनलाल बघेले (२७) रा. कन्हारटोला पिंडकेपार असे मृतक दुचाकीस्वाराचे नाव आहे.
करण चव्हाण (२५), अमित रहिले (२८) रा. खातिया, चंद्रशेखर बिसेन असे गंभीर जखमी असलेल्या युवकांची नाव आहेत. त्यांच्यावर स्थानिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. प्राप्त माहितीनुसार सचिन बघेले व चंद्रशेखर बिसेन हे दुचाकीने गोंदियाकडून बालाघाटच्या दिशेने जात होते. तर, करण चव्हाण आणि अमित रहिले हे विरुद्ध दिशेने दुचाकीने येत होते. दोन्ही दुचाकींचा वेग अधिक असल्याने त्या नियंत्रणात न आल्याने चालकांचे नियंत्रण सुटून दोन्ही दुचाकी एकमेकांवर धडकल्याने हा अपघात झाला. यात सचिन बघेले याचा मृत्यू झाला, तर इतर तीन युवक हे गंभीर जखमी आहे. दरम्यान, उड्डाणपुलावरून जाणाऱ्या वाहन चालकांनी त्वरित अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जात त्यांना उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल केले. दरम्यान, गंभीर युवकांपैकी एका युवकाची स्थित गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची नोंद शहर पोलिसांनी घेतली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी
सोमवारी दुपारच्या सुमारास गोंदिया बालाघाट-मार्गावरील उड्डाणपुलावर हा अपघात घडल्यानंतर दोन्ही बाजूने येणारी वाहतूक कोंडी झाली होती. दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जवळपास अर्धा ते पाऊण तासानंतर वाहतूक सुरळीत झाली.