३० हजारांची लाच घेतली, आणखी ५० हजारांची मागणी केली, नगररचना विभागातील लाचखोर लिपीक अडकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 20:31 IST2023-06-21T20:31:07+5:302023-06-21T20:31:21+5:30
अकृषक करण्यासाठी मागितली लाच

३० हजारांची लाच घेतली, आणखी ५० हजारांची मागणी केली, नगररचना विभागातील लाचखोर लिपीक अडकला
गोंदिया : घर व प्लॉट अकृषक (एनए) करून देण्यासाठी ३० हजार रुपये घेतल्यानंतर आणखी ५० हजार रुपयांची मागणी केली. यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नगर परिषद कार्यालयातील नगररचना विभागातील वरिष्ठ लिपिकावर कारवाई करून अटक केली. बुधवारी (दि. २१) ही कारवाई करण्यात आली असून, अब्दुल सलाम वल्द हबीब कुरेशी (५१, रा. नुरी मस्जीदच्या मागे, सिव्हिल लाइन) असे लाचखोर लिपिकाचे नाव आहे.
सविस्तर असे की, तक्रारदार (३१, रा.गोंदिया) त्याची आई व बहिणीच्या नावाने नगर परिषद हद्दीतील घराची अकृषक वापराची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने रद्द झाली आहे. यावर आरोपी अब्दुल सलाम वल्द हबीब कुरेशी याने घर प्लॉटची गुंठेवारी (एनए) करून देण्यासाठी ८० हजार रुपयांची मागणी केली. तसेच यातील ३० हजार रुपये घेऊन टाकले व उर्वरित ५० हजार रुपयांची मागणी करीत होता. यावर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी केली असता अब्दुल सलाम वल्द हबीब कुरेशी याने ३० हजार रुपये घेतल्याचे स्वीकार करून आणखी ५० हजार रुपयांची मागणी पंचांसमक्ष केली. यावर पथकाने बुधवारी (दि. २१) त्याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. आरोपीविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अतुल तवाडे, स.फौ. विजय खोब्रागडे, हवालदार संजय बोहरे, संतोष शेंडे, अशोक कापसे, कैलास काटकर, प्रशांत सोनवाने, संगीता पटले, चालक दीपक बतबर्वे यांनी केली आहे.