आज निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावणार; जाहीर प्रचार बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 15:02 IST2024-11-18T15:01:54+5:302024-11-18T15:02:38+5:30
Gondia : आता प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर, नेते व उमेदवारांचे बंदव्दार मंथन झाले सुरु

Today the campaign guns of the election will cool down; Public campaigning off
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या १३ दिवसांपासून सुरू असणारी रणधुमाळी आता सरण्याच्या मार्गावर आहे. २० नोव्हेंबरला मतदान होणार असल्याने त्याच्या ४८ तासांपूर्वी म्हणजे सोमवारी (दि. १८) सायंकाळी ६ वाजता प्रचारतोफा थंडावणार आहे. यामुळे गेल्या १३ दिवसांपासून चारही मतदारसंघांत सकाळपासून ऐकू येणारे गाणे व भोंग्यांचा आवाज बंद पडणार आहे.
जाहीर प्रचार बंद होत असल्याने आता सर्वच उमेदवार व प्रमुख पक्षांचा मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर असणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया ४ नोव्हेंबरला पार पडल्यानंतर चित्र स्पष्ट होऊन जिल्ह्यातील गोंदिया, अर्जुनी मोरगाव, तिरोडा व आमगाव या चारही मतदारसंघांत ५ नोव्हेंबरपासून जाहीर प्रचाराला सुरुवात झाली होती.
सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी गेल्या १३ दिवसांत पक्षाच्या दिग्गज नेत्यांचा प्रचारसभा घेऊन मतदारांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मन वळविण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला. निवडणूक प्रचारामुळे सकाळपासूनच गाणी आणि लक्ष असू द्याचे भोंगे वाजत होते. हे चित्र जिल्ह्यातील चारही मतदारसंघांत कायम होते. पण, सोमवारी सायंकाळी ६ वाजतानंतर जाहीर प्रचार करता येणार नसल्याने आता प्रचाराचे भोंगे शांत होणार आहे, निवडणूक रिंगणातील ६४ उमेदवार आणि त्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा भर थेट मतदारांच्या गाठीभेटीवर असणार आहे.
व्हाइस कॉलवरून मतांचा जोगवा
कमी कालावधीत अधिक मतदारांपर्यंत पोहचता यावे, यासाठी सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत व्हॉइस कॉलवरून मतदारांना मतांचा जोगवा मागण्यास सुरुवात केली आहे. रविवारी सायंकाळपासूनच उमेद- वारांच्या व्हाइस कॉलने मतदारांचे मोबाइल खणखणले.
प्रचाराचा सुपर मंडे आज, शक्तिप्रदर्शनाचे नियोजन
सोमवारी सायंकाळी ६ वाजता जाहीर प्रचार बंद होणार आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी पदयात्रा, रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन करून मतदारांवर अखेरची छाप पाहण्याचे नियोजन केले आहे. महाविकास व महायुतीच्या उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात बाइक रॅलीचे आयोजन केले आहे, तर तिरोडा आणि सडक अर्जुनी येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची प्रचारसभा होणार आहे.
आता मतांचे समीकरण जुळविण्यावर भर
२० नोव्हेंबरला चारही मतदारसंघांत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे सोमवार आणि मंगळवार हे दोन्ही दिवस महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे या दोन दिवसांत मतदारांचे मतपरिवर्तन करून त्यांना आपल्याकडे वळविण्यासाठी विविध फंडे वापरून समीकरण जुळविण्यावर प्रमुख उमेदवार आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचा भर असणार आहे.