जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये विजेची सोयच नाही; चिमुकल्यांना सोसावा लागतो गर्मीचा त्रास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 16:00 IST2025-01-28T15:59:38+5:302025-01-28T16:00:43+5:30
Gondia : शेजारच्या घरून करावी लागते सोय; ४३ अंगणवाड्या भरतात भाड्याच्या खोलीत, दोन खासगी इमारतीत

There is no electricity in the district's anganwadis; children have to suffer from the heat
नरेश रहिले
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त असून, जिल्ह्यातील १,०१४ अंगणवाड्यांत विजेची सोयच नसल्याने चिमुकल्यांना त्रास सहन करावा लागत आहे. विजेअभावी अंगणवाड्यांत प्रकाश पडणार कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वीजपुरवठा नसल्याने चिमुकल्यांना अंगणवाडीत केंद्रात बसवून धडे द्यायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने सुसज्ज बांधलेल्या अंगणवाडी केंद्रात वीज जोडणी देऊन मुलांच्या भविष्याचा विचार करण्याची मागणी पालक करू लागले आहेत. अनेक अंगणवाड्या भाड्याच्या खोलीत सुरू आहेत. काही अंगणवाडी इमारती बांधून पूर्ण झाल्या असल्या तरीही त्यात विजेची सोय नाही. काही कारणामुळे लांबलेले मुलांचे स्थलांतर थांबले आहे; परंतु केंद्रात वीज जोडणी नसल्याने मुलांना उन्हाळ्यात त्रास सहन करावा लागणार आहे.
आहार मिळतो म्हणून अंगणवाड्या आहेत सुरु
६ वयोगटांतील मुलांना शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी खेड्यापाड्यांत अंगणवाड्यांची निर्मिती केली; परंतु अंगणवाड्यांची फारच दयनीय अवस्था आहे. गोंदिया जिल्ह्यात १,७२४ पैकी १,०१४ अंगणवाड्यांमध्ये विजेचा अभाव आहे. फक्त आहार मिळतो म्हणून अंगणवाडी सुरू, अशी परिस्थिती आहे.
नको ते बालशिक्षण म्हणण्याची येऊ देऊ नका
- वीज जोडणीसाठी पालकांनी अनेक लोकप्रतिनिधींकडे हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली; परंतु प्रशासकीय यंत्रणेला ना चिमुकल्या जिवांची चिंता ना पालकांच्या चिंतेची तमा. लवकरच उन्हाळ्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे अंगणवाडी केंद्रात चिमुकल्यांना वाढत्या तापमानात बसवायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला.
- ज्याठिकाणी लहान मुलांना 3 शिक्षणाची गोडी निर्माण व्हायला हवी त्याच ठिकाणी योग्य ती साधन-सुविधा देण्यास सरकार कमी पडत आहे. अशाने मुलांना शिक्षणाची गोडी लागणारच नाही. जिल्ह्यातील १८ अंगणवाड्या प्राथमिक शाळेच्या परिसरात भरतात. १५ अंगणवाडी समाजमंदिरांत, ८ अंगणवाडी ग्रामपंचायत आवारांत, तर १६ अंगणवाडी इतर ठिकाणी भरतात.