गोंदिया जिल्ह्यात फक्त तीनच ठिकाणी वीजरोधक यंत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 17:13 IST2025-06-09T16:39:34+5:302025-06-09T17:13:39+5:30
प्रस्ताव टाकूनही फायदा नाही : प्रत्येक तालुक्यात हवे यंत्र

There are only three places with lightning protection devices in Gondia district.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात वीज पडून दरवर्षी कित्येकांचा जीव जातो. अशात वीजरोधक यंत्र बसविणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, असे असतानाही जिल्ह्यात फक्त तीनच ठिकाणी वीजरोधक यंत्र बसविण्यात आल्याची माहिती आहे. तीन तालुक्यांत प्रत्येकी एका ठिकाणी हे यंत्र बसविण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्यात वीजरोधक यंत्र बसविण्यात यावे, असा प्रस्ताव टाकण्यात आला असतानाही अद्याप उर्वरित तालुक्यांत वीजरोधक यंत्र बसविण्यात आलेले नाही.
मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या सुरुवातीच्या कालखंडात विशेषतः माहे मे, जून व जुलै तसेच मान्सून पश्चात साधारणतः माहे ऑक्टोबर या महिन्यात राज्यात अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावतो. मान्सून दाखल झाल्यावर साधारणतः पहिल्या पावसात शहरी भागाबरोबरच विशेषकरून ग्रामीण भागात वीज कोसळून अनेक शेतकरी व नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. जिल्ह्यातही वीज पडून दुर्घटना होत असतात. वीज पडण्याच्या घटनेतील जीवितहानी कमी करण्यासाठी किंबहुना टाळण्यासाठी काही ठोस उपाययोजना सुरू आहेतच.
पावसाळ्याची सुरुवात ही नेहमीच वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह असते. ही प्रक्रिया वातावरणातील बदलांमुळे होत असल्याने ती अपरिहार्य आहे. कारण ही प्रक्रिया झाली नाही तर कदाचित पाऊसही पडणार नाही. अशात वीजरोधक यंत्र बसविल्यास त्या परिसरात वीज पडण्याची घटना टाळून जीवितहानी टाळता येऊ शकते.
यातूनच वीजरोधक यंत्र बसविणे गरजेचे आहे. मात्र, जिल्ह्यात सध्यातरी तीनच ठिकाणी वीजरोधक यंत्र बसविण्यात आले आहे. तीन तालुक्यांत प्रत्येकी एक असे हे यंत्र बसविण्यात आले असून उर्वरित तालुक्यांतही यंत्र बसविणे प्रस्तावित आहे.
वीजरोधक यंत्र म्हणजे काय?
- वीजरोधक असलेल्या ठिकाणापासून २ किमीच्या आत वीज पडत नाही.
- वीजरोधक यंत्र बसविल्याने त्या परिसरात विजेच्या घटना टाळल्या जातात.
- वीज पडून प्राणहानी होऊ नये यासाठी वीजरोधक महत्त्वाची भूमिका बजावते.
जिल्ह्यात येथे वीजरोधक यंत्र
आमगाव तालुक्यातील ग्राम अंजोरा येथे, गोंदिया तालुक्यातील ग्राम काटी येथे तसेच अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील तहसील कार्यालयात असे एकूण तीन वीजरोधक यंत्र बसविण्यात आले आहे.