नागरिकांच्या सतर्कतेने टळला युवकाच्या आत्महत्येचा प्रयत्न
By अंकुश गुंडावार | Updated: October 19, 2023 17:44 IST2023-10-19T17:38:05+5:302023-10-19T17:44:54+5:30
सिंधी कॉलनीतील घटना : शहर पोलिसांनी घेतले अज्ञात युवकाला ताब्यात

नागरिकांच्या सतर्कतेने टळला युवकाच्या आत्महत्येचा प्रयत्न
गोंदिया : शहर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सिंधी कॉलनीत अज्ञात युवकाने घरात घुसून इमारतीवरून खाली उडी मारण्याचा प्रयत्न करीत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी घटनास्थळी धावून जात युवकाला पकडले. त्यामुळे युवकाच्या आत्महत्येचा प्रयत्न टळला. ही घटना गुरुवारी (दि.१९) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार सिंधी कॉलनी येथील रहिवासी प्रकाश वाधवानी यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर गुरुवारी दुपारच्या सुमारास अज्ञात युवक अचानक पायऱ्यावरून वर जाताना त्यांच्या शेजाऱ्यांना दिसला. दरम्यान तो वाधवानी यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर चढल्यानंतर तेथून उडी मारण्याचा प्रयत्न करीत होता. दरम्यान हा प्रकार वाधवानी यांच्या शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडोओरड केली तसेच त्या युवकाला वाचविण्यासाठी दुसऱ्या मजल्यावर पोहोचले. तसेच त्या युवकाला उडी मारण्यापासून रोखले.
दरम्यान, वाधवानी यांच्या शेजारी राहणारे नगरसेवक लोकेश यादव यांनी गोंदिया शहर पोलिस स्टेशनला फोन करुन घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी व शेजाऱ्यांनी अज्ञात युवकाला ताब्यात घेतले. पोलिसांनी युवकाची पोलिस ठाण्यात नेऊन चौकशी केली. त्यात युवक मानसिक रुग्ण असल्याचे पुढे आले.