टिप्परची मोटारसायकलला धडक; अपघातात मुलगा ठार, वडील गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2022 17:12 IST2022-06-30T16:48:26+5:302022-06-30T17:12:36+5:30
अपघातानंतर टिप्पर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

टिप्परची मोटारसायकलला धडक; अपघातात मुलगा ठार, वडील गंभीर जखमी
वडेगाव (गोंदिया) : टिप्परने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत मुलगा ठार तर वडील व एक मुलगा गंभीर झाल्याची घटना बुधवारी (दि. २९) सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा बसस्थानक परिसरात घडली.
पीयूष सुरेश कांबळी (१२, रा. घाटकुरोडा) असे अपघातात ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. तर सुरेश कांबळी (४०) असे वडिलाचे नाव आहे. तर धुरुप कांबळे असे जखमी मुलाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार सुरेश कांबळी हे बुधवारी सायंकाळी त्यांच्या पीयूष व धुरुप या दोन्ही मुलांना घेऊन मोटारसायकल क्रमांक एमएच ३६, पी ६५८५ ने तिरोडाकडून घाटकुरोडाकडे जात होते. दरम्यान, मुंडीकोटा बसस्थानक परिसरात एका भरधाव टिप्परने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. यात पीयूषचा जागीच मृत्यू झाला, तर सुरेश कांबळी आणि त्यांचा मुलगा धुरुप हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर टिप्पर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.
दरम्यान, जखमी असलेल्या वडील आणि मुलाला गावकऱ्यांनी रुग्णवाहिका बोलावून तुमसर येथील रुग्णालयात दाखल केले. या मार्गावरून अवैध मुरुमाची वाहतूक सुरू असून, दिवसभर टिप्परची वर्दळ असते. त्यातूनच हा अपघात घडल्याचे बोलले जाते.