शेतकऱ्याच्या आत्महत्येचा आकडा पुन्हा वाढतोय; बोंडगावदेवीत हळहळजनक घटना

By अंकुश गुंडावार | Updated: June 3, 2025 19:27 IST2025-06-03T19:26:25+5:302025-06-03T19:27:02+5:30

७६ हजारांचं कर्ज, आत्महत्येचा टोकाचा निर्णय : रामू बारस्कर शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल

The number of farmer suicides is increasing again; A shocking incident in Bondgaondevi | शेतकऱ्याच्या आत्महत्येचा आकडा पुन्हा वाढतोय; बोंडगावदेवीत हळहळजनक घटना

The number of farmer suicides is increasing again; A shocking incident in Bondgaondevi

अर्जुनी मोरगाव (गोंदिया) : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने घराच्या आड्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. ३) सकाळी तालुक्यातील बोंडगावदेवी येथे घडली. रामू शंकर बारस्कर (५५, रा. बोंडगावदेवी) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील बोंडगावदेवी येथील रामू शंकर बारस्कर हे अल्पभूधारक शेतकरी असून, गावाजवळील सरांडी रिठी शेतशिवारात त्यांची दोन एकर कोरडवाहू शेती आहे. शेतात सिंचनाची सोय नसल्याने त्यांना पीक घेण्यास अडचण जात होती. पत्नी, मुलगी, मुलगा यांचा उदरनिर्वाह या शेतीवरच चालत होता. सततची नापिकी आणि कर्जाचा वाढता डोंगर, यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून तणावात होते. मंगळवारी सकाळी त्यांनी घरी कुणीही नसताना घराच्या आड्याला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक नरेश मारवाडे, पोलिस हवालदार कृष्णा मेंढे, बागडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी अर्जुनी मोरगाव पोलिस स्टेशन येथे मर्ग दाखल करण्यात आला.

७६ हजारांचे बँक कर्ज
रामू बारस्कर यांच्यावर विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा बोंडगावदेवीचे ७६ हजार ३९४ रुपयांचे पीक कर्ज थकीत होते. तसेच आठ दिवसांपूर्वी शेतामध्ये सिंचनाची सोय व्हावी म्हणून बोअरवेल खोदला, पण पाणी लागले नाही. त्यात त्यांनी केलेला खर्च व्यर्थ गेला. यामुळे त्यांच्या चिंतेत वाढ झाली होती.

Web Title: The number of farmer suicides is increasing again; A shocking incident in Bondgaondevi