इटियाडोह अखेर ओव्हरफ्लो झाला! वर्षानुवर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 19:32 IST2025-08-18T19:30:13+5:302025-08-18T19:32:16+5:30

रविवारी दुपारी ३ वाजताचा मुहूर्त : आता पर्यटकांची गर्दी

The Itiadoh has finally overflowed! The years of waiting have finally come to an end. | इटियाडोह अखेर ओव्हरफ्लो झाला! वर्षानुवर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम

The Itiadoh has finally overflowed! The years of waiting have finally come to an end.

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :
मागील कित्येक दिवसांपासून हुलकावणी देत असलेला अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इटियाडोह प्रकल्प रविवारी (दि.१७) दुपारी ३ वाजताच्या मुहूर्तावर अखेर ओव्हरफ्लो झालाच. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात तसेच प्रकल्प परिसरात शनिवारी झालेल्या पावसामुळे प्रकल्प ओव्हरफ्लो होण्याची शक्यता शनिवारीच वर्तविण्यात आली होती.


अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इटियाडोह प्रकल्प हा जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असून ३८१.५८७ एमएमक्यू सिंचन क्षमता असलेल्या या प्रकल्पाला ओव्हरफ्लो होण्यासाठी मोठ्या प्रमाणात पावसाची गरज असते. हेच कारण आहे की, बहुतांश वेळी हा प्रकल्प ओव्हरफ्लो होत नाही. यंदा जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे प्रकल्प ९९ टक्यांवर भरलेला होता व ओव्हरफ्लो होण्याची शक्यता दोन वेळा वर्तविण्यात आली होती. मात्र, पावसाने दडी मारल्याने प्रकल्प ओव्हरफ्लो झाला नाही.


अशातच शनिवारी बाघ-इटियाडोह सिंचन विभागाकडून प्रकल्प १०० टक्के भरल्याने तसेच प्रकल्प परिसरात पाऊस सुरू असल्याने प्रकल्प ओव्हरफ्लो होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. विभागाचा हा अंदाज यंदा खरा ठरला व रविवारी (दि.१७) दुपारी ३ वाजता दरम्यान इटियाडोह प्रकल्प अखेर ओव्हरफ्लो झाला.


विभागाने दिला सतर्कतेचा इशारा

  • प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने नदी काठावरील गावांना तसेच नदीपात्रातून आवागमन करणाऱ्या सर्व संबंधितानी स्वतःची काळजी बाळगावी असा सतर्कतेचा इशारा विभागाकडून देण्यात आला आहे.
  • नागरिकांनी नदीपात्र ओलांडू नये, शेतीची अवजारे नदीपात्रात ठेवू नये, जनावरांना नदीपात्र ओलांडू देऊ नये, जलाशयाच्या सांडव्यावरून ओव्हरफ्लो होणारा विसर्ग कमी जास्त असू शकतो. त्यामुळे नदीपात्राजवळ जाणे टाळावे असेही विभागाने कळविले आहे.


आता पर्यटकांची गर्दी वाढणार

  • इटियाडोह प्रकल्पाचा ओव्हरफ्लो १ म्हणजे पर्यटकांसाठी एक पर्वणीच असते. प्रकल्पाचा ओव्हरफ्लो म्हणजे एक विहंगम दृश्य असून दरवर्षी हे दृश्य बघण्याची संधी पर्यटकांना मिळत नाही.
  • मात्र, आता प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने याची साक्ष बनण्यासाठी आता प्रकल्पावर चांगलीच गर्दी वाढणार आहे. विशेष म्हणजे, तीन दिवसांच्या सलग सुट्यांमध्येही पर्यटकांनी येथे चांगलीच गर्दी केली होती.

Web Title: The Itiadoh has finally overflowed! The years of waiting have finally come to an end.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.