'स्ट्रॉबेरी' झाली स्वस्त; मधुमेह आणि वजन कमी करण्यासाठी कशी आहे फायद्याची?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 16:04 IST2025-02-21T16:03:26+5:302025-02-21T16:04:09+5:30
Gondia : दरात झाली घसरण, आता मिळत आहेत बॉक्स

'Strawberries' have become cheaper; How is it beneficial for diabetes and weight loss?
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : लाल रंगाची आकर्षक आणि आंबट-गोड चव असणारी स्ट्रॉबेरी सर्वांच्याच आवडीचे फळ आहे. स्ट्रॉबेरीला डिसेंबर अखेर आणि जानेवारीच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. गेल्या १५ दिवसांत घाऊक बाजारात किलोच्या भावात १०० रुपयांनी घट झाली आहे.
त्यामुळे स्ट्रॉबेरी आवाक्यात आली आहे. शरीरासाठी फळांचे सेवन अत्याधिक महत्त्वाचे असल्याचे सांगितले. पोषक तत्त्वांचा खजाना फळांमध्ये असतो. त्याचप्रकारे स्ट्रॉबेरीमध्येही पोषक तत्त्व असल्याने स्ट्रॉबेरीचे सेवन शरीरासाठी फायद्याचे असते. यामुळेच सध्या नागरिकांचा कल स्ट्रॉबेरी खरेदीकडे दिसून येत आहे.
महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी एक नंबर
शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या स्ट्रॉबेरीची अलीकडे ठिकठिकाणी लागवड केली जात आहे; परंतु महाबळेश्वरची तांबडी माती, त्यामधील गुणधर्म, हवा, पाणी स्ट्रॉबेरी फळासाठी अत्यंत पोषक आहे. त्यामुळे येथे पिकणाऱ्या स्ट्रॉबेरीचा रंग, रूप व चव सर्वांत भिन्न असते. अन्य कोठेही अशी रंगसंगती, चव व फळे दिसून येत नाहीत. त्यामुळे महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला जगभरात मागणी आहे.
पोषणतत्त्वांचा खजिना !
स्ट्रॉबेरीमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे मुबलक प्रमाणात असतात. त्यातील व्हिटॅमीन-सी आणि मॅग्नेशियम रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते.
८० रुपयांत २५० ग्रॅमचा बॉक्स
मध्यंतरीच्या काळात येथे स्ट्रॉबेरीचे १२० ते १५० रुपयांत २५० ग्रॅमचे बॉक्स मिळत होते. मात्र आता दरात घसरण झाली असून १०० ते ८० रुपयांत २५० ग्रॅमचे बॉक्स मिळत आहे. साधारणतः किलोमागे ५० ते १०० रुपये दर कमी झाले आहेत.
स्ट्रॉबेरी वजन अन् साखर कमी करते !
स्ट्रॉबेरी सेवनाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. या फळात कॅलरी व साखरेची मात्रा कमी असते. मुबलक फायबर असतात. या फळाच्या सेवनाने वजन व शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. वर्षातून चार ते पाच महिनेच या फळाचा हंगाम असतो.
"स्ट्रॉबेरीमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्वे, लोह, खनिजे, अँटीऑक्सिडंट्स, फ्लेवोनॉईड, फोलेट आणि कॅफेरोल असतात. त्यामुळे त्याचे सेवन आरोग्यास फलदायी आहे. आयुर्वेदानुसार स्ट्रॉबेरी वात संतुित व कब्ज दूर करते."
- डॉ. अपर्णा खोब्रागडे, आयुर्वेदाचार्य