एसटी बसचे लोकेशन कुठेय? आता घरबसल्या समजणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 16:48 IST2024-07-05T16:46:56+5:302024-07-05T16:48:36+5:30
राज्य परिवहन महामंडळाचे अॅप आले : प्रवाशांना मिळणार माहिती

ST bus app is available on playstore, you can track bus location now?
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : स्थानकात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला आपली बस केव्हा येणार हाच एक प्रश्न सतावत असतो. आता प्रवाशांची ही चिंता दूर झाली आहे. त्यांना हवी असलेली बस कुठे आहे, किती वेळात स्थानकावर येणार यासह अनेक प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर मिळणार आहेत. 'एमएसआरटीसी अॅप'च्या माध्यमातून मोबाइलवर एसटी कुठे थांबली, कधीपर्यंत पोहोचेल याची इत्थंभूत माहिती तुम्हाला कुठूनही मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांच्या सोयीकरिता 'व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम' 'एमएसआरटीसी कॉम्प्युटर' हे नवीन अॅप तयार केले असून, रेल्वे विभागाच्या माहितीप्रमाणे एसटी महामंडळ प्रवाशांची माहिती उपलब्ध करून देत आहे. हे जीपीएस म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम या यंत्रणेमुळे शक्य होणार आहे. महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या या नव्या उपक्रमामुळे प्रवाशांची चांगलीच सोय होणार आहे. बस कुठे आहे ते आता त्यांना घरीबसल्या कळणार आहे.
काय आहे अँप ?
अँपमध्ये तिकीट आरक्षण, लोकेशन ट्रॅकिंग, बस मार्ग, महिला सुरक्षितता, मार्गस्थ गाडीत झालेला बिघाड, वैद्यकीय मदत आणि अपघाती मदतीची सुविधा दिली आहे.
असे करा डाऊनलोड
प्ले स्टोअरवर 'एमएसआरटीसी कॉम्प्युटर अॅप उपलब्ध आहे. मराठी आणि इंग्रजी भाषेत हे अॅप प्रवाशांना वापरता येईल. वापरास अॅप सोपे आहे.
अपघात झाल्यास मदत मिळणार
महिलांना १०० किंवा १०३ क्रमांकावर संपर्क साधण्याची सुविधा तसेच अपघात झाल्याची माहिती, वैद्यकीय मदतही प्रवाशांना अॅपद्वारे मागवता येणार आहे.
बस कुठे आहे हे आधीच कळणार?
बसेसना व्हीटीएस (व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम) बसविली आहे. याद्वारे बसचे लोकेशन, वेळापत्रक या सर्वांची माहिती प्रवाशांना मिळेल.
अभिप्राय, तक्रारी नोंदविण्याची सोय
• एसटी प्रवाशांना ऑनलाइन अभिप्राय देण्याची सुविधा आहे.
• तक्रारींमध्ये 'वाहक-चालक', 'बसस्थिती', 'बससेवा', 'ड्रायव्हिंग', 'मोबाइल अॅप' असे वर्गीकरण केले आहे.
• तक्रारदारास मोबाइल, वाहन क्रमांक नोंदवावा लागेल.
जिल्ह्यातील आगारनिहाय बसेस
गोंदिया - ७६
तिरोडा - ४७
आगारातील सर्वच बसेसमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित आहे. त्यामुळे प्रवाशांना बसेसची स्थिती कळून येते. शिवाय, बसस्थानकातही मोठी स्क्रीन लावली आहे.
- संजना पटले, आगार व्यवस्थापक, तिरोडा