ती पतंग घेऊन आनंदात परतत होती पण.. प्रशासनाच्या दुर्लक्षाने झाला चिमुरडीचा दुर्दैवी अंत ! गावकरी रेल्वे प्रशासनावर संतप्त
By अंकुश गुंडावार | Updated: October 16, 2025 20:38 IST2025-10-16T20:37:34+5:302025-10-16T20:38:31+5:30
कुंभारटोलीतील येथील घटना : उड्डाणपुलाअभावी हाेतात अपघात

She was returning happily with a kite, but.. the administration's negligence led to the unfortunate end of the little girl! Villagers angry at the railway administration
गोदिया : पंतग आणण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडून दुकानात गेलेल्या चिमुकलीचा पंतग घेवून परत येत असताना रेल्वे कटून मृत्यू झाल्याची धक्कादाय घटना गुरुवारी (दि.१६) सायंकाळी आमगाव तालुक्यातील कुंभारटोली येथे घडली. कनिष्का शशिकांत मेश्राम (वय ९ वर्षे) असे रेल्वेने कटून मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार गुरुवारी सायंकाळी कनिष्का आपल्या घराशेजारील बालमित्रांसोबत खेळत होती. खेळता खेळता तिने पतंग घेण्यासाठी घरून पैसे घेतले आणि ती रेल्वे रुळ ओलांडून समोरील दुकानात गेली. पतंग खरेदी केल्यानंतर ती आनंदाने घरी परत येत होती. याच दरम्यान रायपूरकडून नागपूरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या प्रवासी रेल्वे गाडीने तिला चिरडले. अपघात एवढा भीषण होता की कनिष्काचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेंनंतर कनिष्काचे कुटुंबीयांनी घटनास्थळी धावत घेतली. तसेच गावकरी सुध्दा गोळा झाले. या ठिकाणी वांरवार अपघात होत असल्याने गावकऱ्यांनी रेल्वे प्रशासनावर रोष व्यक्त केला. या ठिकाणी पूर्वी रेल्वे गेट होता. परंतु रेल्वे विभागाने चार महिन्यांपूर्वी ते बंद करून उड्डाणपूल (फ्लायओव्हर) उभारला आहे. मात्र, या पुलावरून ये-जा करण्यासाठी सुमारे अर्धा किलोमीटरचा अंतर जावे लागते. त्यामुळे गावातील नागरिक, विशेषतः पादचारी आणि विद्यार्थी, शॉर्टकट म्हणून थेट रेल्वे रुळ ओलांडूनच दुसऱ्या बाजूला जातात. अशातच ९ वर्षीय चिमुकलीचा रेल्वे कटून बळी गेला. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातामुळे कनिष्काच्या घरी आणि गावात शोककळा पसरली असून, “एका पतंगासाठी चिमुकलीने आयुष्य गमावले” या वेदनादायक घटनेने सर्वांच्या डोळ्यात अश्रू आणले.
दाेन बहिणीत कनिष्का होती लहान
शशीकांत मेश्राम यांना दोन मुली असून त्यांची मोठी मुलगी सहाव्या वर्गात आहे. तर कनिष्का ही त्यांची लहान मुलगी होय. कनिष्काचे वडील सालेकसा नगर परिषद येथे तर आई आमगाव नगर परिषदेत कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. कनिष्काच्या अपघाती मृत्यूने मेश्राम कुटुंबीयांना धक्का बसला.
पादचारी पुलाकडे रेल्वे विभागाचे दुर्लक्ष
रेल्वे विभागाने या भागात पादचारी पूल (फूट ओव्हर ब्रिज) बांधण्याकडे दुर्लक्ष केले असून त्यामुळेच अशा दुर्घटना वांरवार घडत आहेत. कुंभारटोली परिसरातील नागरिकांनी रेल्वे प्रशासनाकडे तातडीने पादचारी पुलाची मागणी केली आहे.