योजनांवर योजना, पण पोट मात्र भुकेले; गोंदियात ३१० कुपोषित बालकांचे विदारक वास्तव !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 20:09 IST2025-08-01T20:08:11+5:302025-08-01T20:09:52+5:30
कारणे, अडचणींवर आता विचारमंथन सुरू : १५ वर्षांनंतरही प्रशासनाच्या पदरी अपयश

Schemes upon schemes , but hungry stomachs; The heartbreaking reality of 310 malnourished children in Gondia!
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्यभरात एक लाख ८२ हजार बालके कुपोषित असल्याचे राज्य सरकारने विधानसभेत मान्य केले आहे. राज्यात पोषण आहारासह अनेक योजना असताना जिल्ह्यात ३१० बालके तीव्र कुपोषित तर १५१५ बालके मध्यम कुपोषित कशी, असा प्रश्न आहे. त्यामुळे यामागील कारणे आणि अडचणी काय यावर, आता विचारमंथन सुरू झाले आहे.
गेल्या १५ वर्षापासून जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा राबत आहे; मात्र आजही कुपोषित बालके आढळून येत आहेत. गर्भावस्थेदरम्यान आरोग्याकडे दुर्लक्ष आणि वैद्यकीय कारणांमुळे कुपोषित बालकांचा जन्म होत आहे. अगदी अलीकडील आकडेवारीनुसार जिल्ह्यात ३१० तीव्र आणि १५१५ मध्यम कुपोषित बालके आहेत.
जिल्ह्यात सुमारे एक हजार ७२४ अंगणवाड्या असून, त्यामध्ये तितक्याच सेविका व तितक्याच मदतनीस कार्यरत आहेत. मिनी अंगणवाड्याही आहेत. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे कुपोषण रोखण्यासाठी यंत्रणा राबवली जाते. दर महिन्याला अंगणवाडीमध्ये शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांची तपासणी केली जाते. वयाप्रमाणे वजन, उंचीनुसार कुपोषणाची वर्गवारी केली जाते.
बालकांसाठी योजना
कुपोषणामुळे बालकांचा मृत्यू टाळण्यासाठी लाखोंचा खर्च होतो. त्यामुळेच आठ-दहा वर्षांत एकाही कुपोषित बालकाचा मृत्यू झालेला नाही.
कुपोषण टाळण्यासाठी
- सुदृढ गर्भारपण आवश्यक आहे. त्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पोषण आहार व औषधे घ्यावीत. बाळ जन्मानंतर पहिले सहा महिने स्तनपान अत्यंत गरजेचे आहे.
- सहा महिन्यांनंतर २ स्तनपानासोबतच घरी बनविलेल्या ताज्या पूरक आहाराची आवश्यकता आहे. तसेच गरजेनुसार कॅल्शियमच्या गोळ्या घेणे, वेळोवेळी हिमोग्लोबिनची तपासणी करणे गरजेचे आहे. या सर्व उपाययोजना कुपोषण टाळू शकतात.
आकडेवारी काय सांगते ?
तालुका मध्यम कुपोषित तीव्र कुपोषित
गोंदिया-१ १३६ ३३
गोंदिया-२ ३१८ ३९
अर्जुनी-मोरगाव २४३ ३८
सालेकसा ५९ १९
देवरी २७३ ५९
सडक-अर्जुनी ९१ ३०
आमगाव १०७ २१
तिरोडा २५२ ४६
गोरेगाव ३६ २५
एकूण १५१५ ३१०
काही बालकांवर प्रशासनाचे विशेष लक्ष
- सॅम म्हणजे तीव्र आणि मॅम म्हणजे मध्यम असे वर्गीकरण केले जाते. सॅम वर्गवारीतील बालकांना मृत्यूचा धोका असतो. त्यामुळे त्यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाते.
- तीव्र कुपोषित बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी गावात ग्राम बालविकास केंद्रे स्थापन केली आहेत. अंगणवाडीच्या माध्यमातून या बालकांना २० दिवस पौष्टिक आहार दिला जातो.
- १७२४ अंगणवाड्या जिल्ह्यात असून, त्यामध्ये तितक्याच सेविका व तितक्याच मदतनीस कार्यरत आहेत. मिनी अंगणवाड्याही आहेत.