जिल्ह्यातील ५४५ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण झाले जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 18:15 IST2025-04-16T18:13:48+5:302025-04-16T18:15:02+5:30
२७४ पदे महिलांसाठी राखीव : याच आरक्षणानुसार होणार पुढील पाच वर्षात निवडणुका

Reservation for the post of Sarpanch of 545 Gram Panchayats in the district has been announced.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येणाऱ्या पाच वर्षातील जिल्ह्यातील ५४५ ग्रामपंचायतींचे आरक्षण निश्चित झाले झाले आहे. ५४५ पैकी २७२ पदे आरक्षित असणार आहेत, तर २७३ सरपंचपदे ही खुली राहणार आहेत. महिलांसाठी तब्बल २७४ पदे आरक्षित असणार असून, यातील १३७पदे ही खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राहणार आहेत.
सन २०२५ ते २०३० या कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी हे सरपंचपद आरक्षण निश्चित झाले आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला आदेश देण्यात आले. शासन आणि राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, तालुकानिहाय सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ५४५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांनी मंगळवारी (दि.१५) जाहीर केली. याच आरक्षण सोडतीनुसार आता पुढील पाच वर्षातील म्हणजे २०२५ ते २०३० या कालावधीत येथील सरपंचपदाच्या निवडणुका होणार आहे. सरपंच पदाची ही आरक्षण सोडत ही त्या त्या प्रवर्गाच्या लोकसंख्येच्या आधारावर निश्चित करण्यात आले आहे. आरक्षण सोडतीनंतर आता इच्छुकांनी यासाठी मोर्चेबांधणी सुरु करणार आहेत.
२४ एप्रिल रोजी
तालुकास्तरावर सोडत जिल्ह्यातील ५४५ ग्रामपंचायत सरपंचाचे आरक्षण निश्चित करण्यात आले. यानंतर आता कोणत्या ग्रामपंचायतचे सरपंचपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव असणार याची आरक्षण सोडत २४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता सर्व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे
३३९ सदस्य व ६ सरपंचपदासाठी होणार पोटनिवडणूक
जात वैधता प्रमाणपत्र, निधन आणि इतर कारणामुळे जिल्ह्यातील ३३९ ग्रामपंचायत सदस्य व ६ सरपंचाची पदे रिक्त आहे. या रिक्तपदांसाठी जिल्ह्यात लवकरच पोटनिवडणूक होणार असल्याची माहिती आहे.
असे असणार प्रवर्गानुसार सरपंचपदाचे आरक्षण
जिल्ह्यातील ५४५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदापैकी अनुसूचित जातीसाठी ६७ सरपंचपदे आरक्षित राहणार आहेत. यापैकी ३४ महिलांकरिता, अनुसूचित जमाती १०० पदांपैकी ५० महिलांकरिता राखीव, ओबीसी प्रवर्गासाठी १०५ पदांपैकी ५३ महिलांसाठी राखीव, तर खुला प्रवर्ग २७३ सरपंचपदांपैकी १३७पदे महिलांसाठी राखीव असणार आहेत, तर एकूण ५४५ सरपंचपदांपैकी २७४ पदे ही महिलांसाठी राखीव असणार आहेत. आता कोणत्या ग्रामपंचायतीचे सरपंचपद नेमके कोणत्या प्रवर्गासाठी राखीव झाले आहे हे २४ एप्रिलच्या सोडतीनंतर स्पष्ट होईल.
जिल्ह्यातील तालुकानिहाय सरपंचाची संख्या
तालुका सरपंच संख्या
गोंदिया ११०
तिरोडा ९३
गोरेगाव ५६
देवरी ५५
आमगाव ५७
सालेकसा ४०
अर्जुनी मोरगाव ७१
सडक अर्जुनी ६३
एकूण ५४५
अनेक इच्छुकांच्या आरक्षण सोडतीकडे लागल्या होत्या नजरा
५४५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठीचे आरक्षण काय निघते, याकडे गावागावातील इच्छुकांच्या नजरा लागल्या होत्या. जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांनी बुधवारी जिल्ह्यातील एकूण ५४५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर केले. त्यामुळे आता इच्छुकांनी आतापासून त्यासाठी मोर्चेबांधणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.