२५ हजार रुपये घेऊन पळ काढला, नेमकं काय घडलं?
By कपिल केकत | Updated: October 12, 2023 18:40 IST2023-10-12T18:40:15+5:302023-10-12T18:40:57+5:30
आरोपीने कमल मस्करे यांच्या परिचयाच्या लोकांसोबत जवळीक वाढवून त्यांचा विश्वास संपादन केला.

२५ हजार रुपये घेऊन पळ काढला, नेमकं काय घडलं?
गोंदिया : नातू रुग्णालयात भरती असल्याने त्याच्या नातेवाइकांसोबत जवळीक वाढवून त्यांच्याकडून २५ हजार रुपये घेऊन आरोपीने पळ काढल्याची घटना शहर पोलिस ठाण्यांतर्गत न्यू गोंदिया हॉस्पिटलमध्ये २८ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. फिर्यादी कमल घोगू मस्करे (५३, रा. चिखली, बालाघाट) यांचा नातू न्यू गोंदिया हॉस्पिटलमध्ये भरती होता.
यावेळी आरोपीने कमल मस्करे यांच्या परिचयाच्या लोकांसोबत जवळीक वाढवून त्यांचा विश्वास संपादन केला. तसेच कमल मस्करे यांच्या मुलीला तुझ्या वडिलांनी दवाखान्याची फी भरण्यासाठी दिलेले २५ हजार रुपये त्यांनी मागितल्याचे खोटे सांगितले. यावर तिने २५ हजार रुपये दिले असता आरोपीने त्यांची फसवणूक केली व ते पैसे घेऊन पसार झाला. याप्रकरणी कमल मस्करे यांनी ११ ऑक्टोबर रोजी पोलिसांत तक्रार दिली असता पोलिसांनी भादंवि कलम ४२० अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.