पाण्याअभावी रब्बीतील धान करपले; शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 17:45 IST2025-03-21T17:45:04+5:302025-03-21T17:45:50+5:30
मोहगाव तिल्ली परिसरात गंभीर स्थिती : काही शेतकऱ्यांनी हिरवा धान कापला

Rabi paddy crops failed due to lack of water; farmers face loss of livelihood
दिलीप चव्हाण
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : मोटारपंप असूनही नियमित वीजपुरवठा होत नसल्याने रब्बी हंगामातील धान करपले तर काही शेतकऱ्यांनी पाण्याअभावी धानाचे नुकसान होत असल्याचे पाहून हिरवा धान कापणी करून संताप व्यक्त केला. हा प्रकार तालुक्यातील मोहगाव तिल्ली परिसरात गुरुवारी (दि. २०) घडला.
जिल्ह्यात खरीप हंगामानंतर रब्बी हंगामात धानाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. गोरेगाव तालुक्यातही रब्बी धानाची १० हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. रब्बी हंगामातील रोवणी आटोपली असून, धानाला पाण्याची गरज आहे. रब्बीसाठी जलाशयाचे पाणी सोडले जात आहे. तर ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे ते कृषिपंपाद्वारे पाणी करून पीक घेतात. पण कृषिपंपाला अखंडित वीजपुरवठा होत नाही. त्यात कधी ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड, तर कधी कमी विद्युत दाबाने वीजपुरवठा होत असल्याने शेतीला सिंचन करणे कठीण या समस्येने या परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. तेढा उपकेंद्रांतर्गत येत असलेल्या मोहगाव तिल्ली येथील शेतकरी विनोद गोपीचंद पटले यांनी आपल्या शेतात रब्बीच्या हंगामात लावलेला धान गर्भावस्थेत असताना पाण्याअभावी करपत असल्याचे पाहून कापणी केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी पुढे आला आहे, तर पटले यांच्या प्रमाणेच इतरही शेतकऱ्यांची स्थिती आहे. मोटारपंपाला अखंडित वीजपुरवठा होत नसल्याने अनेक शेतकरी चिंतातुर असून, त्यांच्यावर हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे.
महावितरण विरोधात शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त
मोहगाव तिल्ली येथील शेतकरी विनोद पटले यांनी आपल्या शेतात रब्बीच्या हंगामात धानाची रोवणी केली होती. मात्र तेढा उपकेंद्रांतर्गत येत असलेल्या मोहगाव तिल्ली दोन ट्रान्सफॉर्मर १५ दिवसांपूर्वी जळाल्याने रब्बी हंगामात लावलेल्या धान पिकाला पाणी मिळू शकले नाही. त्यामुळे शेतकरी विनोद पटले यांच्यावर हिरवा धान कापण्याची नामुष्की आली. मोहगाव तिल्ली येथील शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या विरोधात रोष व्यक्त केला.
पंधरा दिवसांपासून ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती नाही
पंधरा दिवसांपूर्वी तेढा उपकेंद्रांतर्गत येत असलेल्या मोहगाव तिल्ली येथील एक रोहीत्र जळाले आहे. या संदर्भात बऱ्याचदा शेतकऱ्यांनी तेढा उपकेंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने मोठ्या प्रमाणावर धान पाण्याअभावी करपत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
मोटारपंपांना अखंडित वीजपुरवठा कधी
शेतकऱ्यांना सिंचनासाठी कृषिपंपाला अखंडित आठ तास वीजपुरवठा करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. लोकप्रतिनिधी त्यांना आश्वासन देत आहेत. पण अद्यापही चार तास विद्युत पुरवठा होत असल्याने शेतकरी अडचणीत आले असून, त्यांना विजेच्या समस्येमुळे तोंडचा घास हिरावण्याची चिंता सतावत आहे.
दोन दिवसात समस्या मार्गी लावा
मोहगाव तिल्ली येथील रोहीत्र जळून पंधरा दिवस झाले पण अद्यापही त्याची दुरुस्ती केली नाही. याचा या परिसरातील अनेक शेतकऱ्यांना फटका बसत आहे. दोन दिवसात ही समस्या मार्गी लावण्याची मार्गी आहे.