'ओपन जिम' निविदा प्रक्रियेत घोळ, गोंदियातील जिल्हा क्रीडाधिकारी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 16:30 IST2025-05-16T16:29:47+5:302025-05-16T16:30:27+5:30

शालेय शिक्षण व क्रीडा उपसचिवांची कारवाई : ३ कोटी १९ लाख रुपयांची निविदा

'Open Gym' tender process disrupted, Gondia District Sports Officer suspended | 'ओपन जिम' निविदा प्रक्रियेत घोळ, गोंदियातील जिल्हा क्रीडाधिकारी निलंबित

'Open Gym' tender process disrupted, Gondia District Sports Officer suspended

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :
जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने जिल्ह्यात ४६ ओपन जिम तयार करण्याकरिता ३ कोटी १९ लाख रुपयांची निविदा काढण्यात आली होती. मात्र या निविदा प्रक्रियेत जिल्हा क्रीडा नंदा खुरपुडे यांनी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने दिलेल्या आदेशाचे पालन न करता ही प्रक्रिया परस्पर राबवून क्रीडा साहित्य खरेदी केले. याप्रकरणी शालेय शिक्षण व क्रीडा उपसचिव सुनील पांढरे यांनी जिल्हा क्रीडाधिकारी नंदा खुरपुडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. 


जिल्हा क्रीडा विभागाच्यावतीने तीन महिन्यांपूर्वी जिल्ह्यात ओपन जिमकरिता साहित्य खरेदीसाठी ३ कोटी १९ लाख रुपयांची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. याअंतर्गत ओपन जिमकरिता लागणारे साहित्य खरेदीसाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने ठरवून दिलेल्या नियमावलीनुसार प्रक्रिया करून ती खरेदी करण्याची गरज होती. मात्र जिल्हा क्रीडाधिकारी नंदा खुरपुडे यांनी तसे न करता नियमांना डावलून क्रीडा साहित्य खरेदीची निविदा प्रक्रिया राबविली. तसेच परस्पर क्रीडा साहित्य खरेदीचे आदेश दिल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाल्याचे क्रीडा व युवक सेवा आयुक्त पुणे यांनी सादर केलेल्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ च्या नियम ४ अन्वये च्या तरतुदीनुसार शिस्तभंगविषयक कारवाई प्रस्तावित करून या नियमाच्या नियम ४ च्या पोट नियम (१) च्या खंड (अ) नुसार जिल्हा क्रीडाधिकारी नंदा खुरपुडे यांना १३ मे २०२५ पासून पुढील आदेशापर्यंत निलंबित केले आहे. 


नंदा खुरपुडे यांचा कार्यकाळ वादग्रस्तच
जिल्हा क्रीडाधिकारी नंदा खुरपुडे या बीड येथे कार्यरत असतानासुद्धा त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. त्यामुळे त्यांचा कार्यकाळ हा सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहिला आहे.


जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली होती तक्रार

  • जिल्हा क्रीडा विभागाअंतर्गत व्यायाम शाळा बांधकाम प्रकरणाची पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तक्रार करण्यात आली होती.
  • त्यावेळी या व्यायामशाळा बांधकामाची निविदा प्रक्रिया रद्द करून नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले होते. तेव्हा सुद्धा जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर
  • ओपन जिमच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता केल्याची तक्रार आयुक्तांकडे करण्यात आली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.


परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये
जिल्हा क्रीडाधिकारी नंदा खुरपुडे यांनी निलंबनाच्या कालावधीत सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. त्यांना मुख्यालय सोडायचे असल्याचे सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.

Web Title: 'Open Gym' tender process disrupted, Gondia District Sports Officer suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.