पोराची हजेरी रजिस्टरवरच; एकाच कामासाठी दोन अँपची गरज काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 16:57 IST2024-09-28T16:55:03+5:302024-09-28T16:57:34+5:30
ग्रामीण भागात बसतोय नेटवर्कचा फटका : नेटवर्कची अडचण ठरतेय बाधक

On the attendance register of the students; why do we need two apps for the same job?
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शिक्षण विभागाच्या आदेशानुसार प्रत्येक शाळेत स्विफ्ट चॅट या मोबाइल अँपवर विद्यार्थ्यांची हजेरी घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाइन पद्धतीने शिक्षकांनी नोंदणी करावयाची आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीतील विद्यार्थी उपस्थिती स्विफ्ट चॅट या अँप्लिकेशननमधील अटेंडन्स बोटाद्वारे ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्याची प्रक्रिया १ डिसेंबर २०२३ पासून सुरू करावयाची होती. परंतु, आधीच एमडीएम अँपवर विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थिती नोंदवली जात आहे. त्यामुळे पुन्हा स्विफ्ट चॅट या मोबाइल अँपवर विद्यार्थ्यांची हजेरी घेणे संयुक्तिक नसल्याची माहिती आहे.
स्विफ्ट चॅट अँपवर हजेरी बंधनकारक
शाळांमधील शिक्षकांनी स्विफ्ट चॅट या मोबाइल अँपद्वारे आपल्या वर्गात उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाइन पद्धतीने नोंदविणे आवश्यक आहे, परंतु आधीच एमडीएम अँपद्वारे ऑनलाइन नोंदणी होत असल्याने पुन्हा हजेरीसाठी दुसरा अँप वापरल्यास एकाच कामात शिक्षकांचा वेळ जाणार असल्याने स्विफ्ट चॅट या मोबाइल अँपचा जिल्ह्यातील शिक्षक वापर करीत नाही. अशी माहिती शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
शाळांमध्ये हजेरी रजिस्टर व एमडीएम अँपवर
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाइन नोंदविण्याचे निर्देश दिले होते. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, नगर परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, अनुदानित शाळांनी ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार एमडीएम अॅप तसेच रजिस्टरवर विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जाते.
गुरुजींची अडचण काय?
ग्रामीण व दुर्गम भागात नेटवर्कची अडचण आहे. त्यात आधीच एमडीएम अँपचा वापर केला जात असल्याने स्विफ्ट चॅट या मोबाइल अँपद्वारे हजेरी घेतली जात नाही.
"एमडीएम अँपवर ऑनलाइन हजेरी भरली जाते. सोबतच रजिस्टरवर हजेरी घेतली जाते. त्यात पुन्हा स्विफ्ट चॅट अँपचा वापर करणे, म्हणजे शिक्षकांवर अविश्वास दर्शविल्यासारखे होईल. त्यात ग्रामीण भागात नेटवर्कची अडचण आहे. त्यामुळे अँपवरुन हजेरी घेणे शक्य नाही."
- एस. यू. वंजारी, शिक्षक.
"एमडीएम अँपवर विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविली जात आहे. ऑनलाइन नोंदणी होत आहे. तसेच रजिस्टरवर सुद्धा हजेरी घेतली जाते. त्यामुळे स्विफ्ट चॅट अँपचा वापर केला जात नाही."
- सुधीर महामुनी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, गोंदिया,