शाळेच्या शौचालयात आढळले जिवंत अर्भक; एकच खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2022 16:40 IST2022-11-02T16:36:16+5:302022-11-02T16:40:00+5:30
सडक अर्जुनी तालुक्याच्या राका येथील घटना

शाळेच्या शौचालयात आढळले जिवंत अर्भक; एकच खळबळ
गोंदिया : सडक-अर्जुनी तालुक्याच्या राका येथील जिल्हा परिषद शाळेच्या शौचालयात जिवंत नवजात अर्भक आढळले. ही घटना २ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता उघडकीस आली. या घटनेने गावात चांगलीच खळबळ उडाली आहे.
शाळेच्या परिसरात लहान बाळाच्या रडण्याचा आवाज काही लोकांना आल्याने काही नागरिकांनी पाहणी केली असता त्यांना जिल्हा परिषद शाळेच्या शौचालयात रक्ताने माखलेले बाळ दिसले. त्यामुळे काही नागरिकांनी त्याला सौंदड येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी हलविले. बाळाचे वजन २.५० किलोग्रॅम असल्याचे सांगण्यात आले.
नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली आहे. या घटनेमुळे गावामध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. जिवंत नवजात बाळाला फेकून देणारी अशी निर्दयी क्रूर माता कोण? अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या बाळाला टाकून देण्यात आल्याची चर्चा गावात होती. या घटनेची नोंद डुग्गीपार पोलिसांनी घेतली आहे.