नायब तहसीलदारांचे दोन तास धरणे आंदोलन, २८ डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन
By नरेश रहिले | Updated: December 18, 2023 18:57 IST2023-12-18T18:56:32+5:302023-12-18T18:57:02+5:30
मागण्या मंजूर न झाल्यास २८ डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला.

नायब तहसीलदारांचे दोन तास धरणे आंदोलन, २८ डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन
गोंदिया: नायब तहसीलदारांना राजपत्रीत वर्ग-२ यांचे ग्रेड पे ४८०० रूपये करण्यात यावे या मागणीला घेऊन गोंदियाच्या नायब तहसीलदारांनी १८ डिसेंबर रोजी तब्बल दोन तास धरणे आंदोलन केले आहे. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी स्मीता बेलपत्रे यांच्याकडे मुख्यमंत्री, महसूल मंत्री व अप्पर मुख्य सचिव यांच्या नावे निवेदन देण्यात आले. मागण्या मंजूर न झाल्यास २८ डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला.
महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेने नायब तहसिलदार राजपत्रित वर्ग २ यांचे ग्रेड पे ४८०० रूपये करण्यासाठी के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखालील त्रुटी समिती (बक्षी समिती) समोर सादरीकरणावर तत्काळ कार्यवाही करण्यात यावी, या मागणीला घेऊन ५ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेने एक दिवशीय रजा आंदोलन व विभागीय आयुक्त कार्यालय येथे धरणे आंदोलन केले होते. परंतु शासनाने दखल घेतलेली नाही. त्यामुळे १८ डिडसेंबर रोजी दोन तास धरणे आंदोलन केले आहे. आंदोलनात नायब तहसीलदार के.के. अदाने, विशा सोनवाने, पी.बी. तिवारी, सी.एन. बाबडे, एन.एस. चवरे, सीमा पारणे, आप्पासाहेब वनकडे, एन.ए. विटले, शरद हलमारे, अश्वीनी नंदेश्वर, संजय धार्मीक यांचा समावेश होता.