हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेटसाठी ३१ मार्च डेडलाइन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 16:22 IST2025-01-07T16:20:04+5:302025-01-07T16:22:58+5:30
आरटीओं'ची सूचना; दंडात्मक कारवाईचाही उगारला जाणार बडगा : बनावटगिरीला लावणार चाप

March 31st deadline for high security registration number plates
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वाहनांच्या नंबरप्लेटमध्ये छेडछाड किंवा बनावट नंबरप्लेटचा वापर करून अनेकदा गुन्हे केले जातात. त्याचबरोबर त्यामुळे रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांची ओळख पटत नाही. त्याचा विचार करून परिवहन विभागाने नंबरप्लेटमध्ये होणारी बनावटगिरी रोखून त्याचे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख तत्काळ पटावी या हेतूने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट बसविणे बंधनकारक केले आहे. ३१ मार्चपर्यंत सर्व वाहनधारकांना ती नंबरप्लेट बसवण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. मुदतीत नंबरप्लेट न बसविल्यास वाहनांवर कारवाईचाही बडगा उगारण्यात येणार आहे.
वाहनांचा वापर योग्य पद्धतीने करावा हा आरटीओचा नियम आहे. मात्र, अनेकदा वाहनांचा वापर हा अवैधरीत्या केला जातो. अनेकदा मुदतबाह्य वाहनेही रस्त्यावरून धावतात. तसेच बनावट नंबरप्लेट तयार करूनही त्या वाहनांचा वापर गुन्ह्यांसाठी केला जातो.
त्या बनावट नंबरप्लेटवरून वाहनधारकांची ओळख पटत नाहीत. त्यामुळे संबंधित गुन्ह्यांतील संशयितांचा शोध लावणे कठीण जाते. अशा वाहनांमुळे सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होतो. त्याचा विचार करून परिवहन विभागाने आता नंबरप्लेटमध्ये होणारी बनावटगिरी रोखून त्याचे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख तत्काळ पटावी या हेतूने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट बसविणे बंधनकारक केले आहे. ३१ मार्चपर्यंत सर्व वाहनधारकांना ती नंबरप्लेट बसवण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. मुदतीत नंबरप्लेट न बसविल्यास वाहनांवर कारवाईचाही बडगा उगारण्यात येणार आहे.
अशी करावी लागेल कार्यवाही...
केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार राज्य शासनाने सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट बसविणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार आता राज्यासह जिल्ह्यात सर्वच वाहनांना आता ही आधुनिक नंबरप्लेट बसवणे धनकारक केले आहे. प्रत्येक विभागनिहाय त्यासाठी आरटीओ विभागाने एजन्सी निश्चित केली आहे. एचएस- आरपी नंबरप्लेटसाठी बुकिंग करण्यासाठी http://maharashtrahsrp.com हे पोर्टल निश्चित करण्यात आले आहे. वाहनधारकांनी पोर्टलवर बुकिंग करून त्यांच्या सोयीप्रमाणे अपॉइंटमेंट घेऊन एचएसआरपी नंबरप्लेट बसवून घेण्यात यावी.
"सर्व वाहनांना आता हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट बसवणे बंधनकारक आहे. त्यासाठी ३१ मार्च २०२५ ही अंतिम मुदत आहे. त्या मुदतीत सर्व वाहनधारकांनी संबंधित एचएसआरपी नंबरप्लेट बसवून घ्याव्या, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल."
- राजेंद्र केसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी