ई-पीक पाहणी ॲपमध्ये बिघाड आल्याने अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 16:08 IST2025-05-17T16:07:28+5:302025-05-17T16:08:22+5:30

३६ हजार २०० शेतकऱ्यांनी केली नोंदणी : मिळणाऱ्या लाभापासून राहावे लागले वंचित

Many farmers deprived of registration due to glitch in e-Peak Pahani app | ई-पीक पाहणी ॲपमध्ये बिघाड आल्याने अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित

Many farmers deprived of registration due to glitch in e-Peak Pahani app

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :
शासनाने कृषी विभागाच्या विविध योजनांचा व नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची नुकसानभरपाई मिळण्यासाठी ई-पीक पाहणी करणे अनिवार्य केले आहे. पण गेल्या पंधरा दिवसांपासून ई-पीक ॲपमध्ये बिघाड आल्याने त्यात नोंदणी होत नसल्याने रब्बी धान उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे. रब्बीत हंगामात केवळ ३६ हजार ९०० शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे.


रब्बी हंगामातील धान, मका व इतर पिकांची कापणी व मळणी काहीच दिवसांत सुरू होणार आहे. त्यानंतर बरेच शेतकरी हे हमीभावाने शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करतात. पण शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य आहे. ई-पीक पाहणी ॲपमध्ये नोंदणी करून त्यात पीक पेऱ्याची नोंद करून शेतात लावलेल्या पिकाचा लाईव्ह फोटो अपलोड करावा लागतो. ई-पीक पाहणीमध्ये नोंद झाल्यानंतरच शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करून धानाची हमीभावाने विक्री करता येते. पणगेल्या पंधरा दिवसांपासून हे ॲप चालत नसल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकरी नोंदणीपासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांची वेळेत नोंदणी पूर्ण न झाल्यास त्यांना हमीभाव व नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास नुकसानभरपाई मिळण्यापासून वंचित राहावे लागणार आहे.


६० हजार हेक्टरवर विविध पिकांची लागवड
जिल्ह्यात रब्बी हंगामात ४६ हजार हेक्टरवर धान तर उर्वरित क्षेत्रावर इतर पिकांची लागवड करण्यात आली आहे. तर आतापर्यंत केवळ ३६ हजार २०० शेतकऱ्यांनीच ई-पीक पाहणी केली आहे. ई-पाहणी अॅपमध्ये वारंवार खोडा निर्माण होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.


१३९५३ धान विक्रीसाठी केली नोंदणी
रब्बी हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभावाने धानाची विक्री करण्यासाठी जिल्ह्यातील १३९५३ शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत नोंदणीकेली असल्याचे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकाऱ्यांनी सांगितले.


तालुकानिहाय ई-पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या
तालुका              मोबाइलद्वारे नोंदणी     अधिकाऱ्यांनी केली नोंदणी

अर्जुनी मोर.                 २८८८                            १३३०
आमगाव                     २७१५                             ७०३
गोंदिया                       ७५९९                            ११३८
गोरेगाव                       २२५२                            ११६१
तिरोडा                       ४०४८                             ५२५
देवरी                          ३०१४                            १७६८
सडक अर्जुनी              २५२५                              ३९३
सालेकसा                   ३४६४                             १३७७
एकूण                       २८५०५                           ८३९५

Web Title: Many farmers deprived of registration due to glitch in e-Peak Pahani app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.