Maharashtra Election 2019 ; निवडणुकीसाठी गोंदिया आगारच्या ४१ बसेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 06:00 IST2019-10-20T06:00:00+5:302019-10-20T06:00:26+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान घेतले जाणार आहे. जिल्ह्यातील एकू ण १२८२ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. यासाठी येथून या सर्वच मतदान केंद्रांवर निवडणूक साहित्य पाठविले जाईल.

Maharashtra Election 2019 ; निवडणुकीसाठी गोंदिया आगारच्या ४१ बसेस
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विधानसभा निवडणुकी अंतर्गत सोमवारी (दि.२१) मतदान घेतले जाणार असून मतदान साहित्य घेऊन केंद्रांवर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी गोंदिया आगारच्या ४१ बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. यात, गोंदिया उपविभागीय अधिकाऱ्यांना २६ तर देवरी उपविभागीय अधिकाऱ्यांना १५ बसेस दिल्या जाणार आहेत. रविवारी (दि.२०) सकाळी १० वाजता आगाराकडून त्यांना या बसेस दिल्या जाणार आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान घेतले जाणार आहे. जिल्ह्यातील एकू ण १२८२ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. यासाठी येथून या सर्वच मतदान केंद्रांवर निवडणूक साहित्य पाठविले जाईल.
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचारी हे साहित्य घेऊन जाणार व मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सायंकाळी हे साहित्य संबंधित तालुकास्थळी जमा करतील. अशात कर्मचारी व निवडणूक साहित्याची ने-आण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मागविल्या जातात. या बसेस कर्मचाºयांना साहित्यासह त्यांच्या मतदान केंद्रावर सोडून देतील.
यानुसार, गोंदिया आगाराने निवडणुकीसाठी ४१ बसेसचे नियोजन केले आहे. यातील, २६ बसेस गोंदिया उपविभागीय अधिकाऱ्यांना तर १५ बसेस देवरी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिल्या जाणार आहेत.
रविवारी (दि.२०) सकाळी १० वाजता या बसेस येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे तर देवरी येथील आयटीआयमध्ये लावायच्या असून तेथून निवडणूक साहित्य घेऊन कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवर सोडून बसेस परत येतील. तसेच मतदानाची प्रक्रिया आटोपल्यानंतर सोमवारी (दि.२१) सायंकाळी कर्मचाऱ्यांना साहित्यासह केंद्रांवरून घेणार व साहित्य जमा केल्यावर कर्मचाऱ्यांना सोडून बसेस आगारात परतणार आहेत.
१९ हजार रूपये प्रती बस मागणी
गोंदिया आगाराकडून देण्यात येणाऱ्या या ४१ बसेससाठी आगाराकडून प्रती बस १९ हजार रूपयांची मागणी करण्यात आली आहे. मात्र आगाराला अद्याप पैसा मिळालेला नाही. विशेष म्हणजे,सन २०१५ मधील जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लावण्यात आलेल्या बसेसचेही पैसे अद्याप आगाराला मिळाले नसल्याची माहिती आहे.
तिरोडा व अर्जुनी-मोरगावसाठी भंडारा आगाराच्या बसेस
गोंदिया आगाराकडून गोंदिया व आमगाव विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेसाठी ४१ बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. तर तिरोडा व अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघासाठी तिरोडा, भंडारा व पवनी आगारातून बसेस पाठविल्या जाणार आहेत.