बिबट्याचा हल्ला, तीन वर्षांच्या चिमुकल्याला नेले ५० मीटर फरफटत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 16:28 IST2024-12-03T16:27:32+5:302024-12-03T16:28:41+5:30
गावकऱ्यांनी आरडाओरड केल्याने बचावला चिमुकला: आठ-दहा दिवसांपासून आहे बिबट्याची दहशत

Leopard attack, three-year-old boy dragged 50 meters
लोकमत न्यूज नेटवर्क
गोठणगाव : घरच्या छपरीत खेळत असलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याला बिबट्याने पकडून जवळपास ५० मीटर फरफटत नेल्याची घटना अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथे रविवारी (दि. १) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. गावकऱ्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने चिमुकल्याला सोडून जंगलाच्या दिशेने धाव घेतली. त्यामुळे चिमुकल्याचे प्राण वाचले.
प्राप्त माहितीनुसार, गोठणगाव येथील प्रभाग क्रमांक तीन येथील दयाराम साखरे यांचा भाचा मृदुल रुपये नंदेश्वर (३) हा आई-वडिलांसह मंडईनिमित्त आला होता. रविवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास मृदुल मामाच्या घरी छपरीत खेळत होता. तर घरातील मंडळी आपल्या कामात व्यस्त होती. दरम्यान, बिबट्याने साखरे यांच्या घरासमोर प्रवेश करून छपरीत खेळत असलेल्या चिमुकल्या मृदुलच्या मानेला पकडून त्याला फरफटत नेले. यामुळे मृदुलच्या रडण्याचा आवाज येताच रंजित साखरे धावत आले. बिबट्या मृदुलला फरफटत नेत असल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे शेजारी व गावकरी धावत आले, त्यांनी लाठ्याकाठ्या घेऊन बिबट्याचा पाठलाग केल्याने बिबटवाने मृदुलला सोडून जंगलाच्या दिशेने पळ काढला.
बिबट्याने मृद्दलच्या मानेला पकडल्याने तो यात जखमी झाला. त्याला लगेच गोठणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे, गावकऱ्यांनी या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी गोठणगाव येवे दाखल होत माहिती घेऊन पंचनामा केला.
अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर
गोठणगाव हे जंगल परिसराला लागून आहे. त्यामुळे या परिसरात नेहमीच वन्यप्राण्याचा वापर असतो. गेल्या अनेक दिवसापासून या परिसरात बिबट्याचा वावर आहे. हा बिबट्या रात्रीच्या वेळेस गापात प्रवेश करीत असल्याची माहिती आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळी बिबट्याने गावात प्रवेश करून चिमुकल्याला उचलून नेण्याचा प्रयत्न केल्याने गाय- कन्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकथांनी केली आहे.