दिव्यांग विद्यार्थ्यांना मागणीनुसार लेखनिक देणे बंधनकारक; वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणेही गरजेचे नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 19:12 IST2025-08-19T19:10:56+5:302025-08-19T19:12:32+5:30

स्पर्धा परीक्षा देणे झाले सुलभ : दिव्यांग कल्याण विभागाच्या नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर

It is mandatory to provide scribes to disabled students on demand; it is not necessary to submit a medical certificate | दिव्यांग विद्यार्थ्यांना मागणीनुसार लेखनिक देणे बंधनकारक; वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणेही गरजेचे नाही

It is mandatory to provide scribes to disabled students on demand; it is not necessary to submit a medical certificate

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :
राज्यातील स्पर्धा परीक्षांत दिव्यांग उमेदवारांना सोयीसुविधा नाकारल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे आता स्पर्धा परीक्षांत दिव्यांग उमेदवारांना मागणीनुसार लेखनिक व सहायक देणे दिव्यांग कल्याण विभागाने बंधनकारक केले आहे. यामुळे दिव्यांगांना परीक्षा देताना होणारे शारीरिक व मानसिक त्रास कमी होतील. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार वेगळ्या वैद्यकीय प्रमाणपत्राचीही गरज राहणार आहे.


लिहिण्यासाठी सक्षम नसलेल्या दिव्यांग उमेदवारांना त्यांच्या मागणीप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह विविध परीक्षांसाठी लेखनिक आणि इतर सोयी-सवलती पुरवण्याबाबतच्या सूचनांचे परीक्षांचे नियमन करणाऱ्या यंत्रणांकडून काटेकोर पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे दिव्यांग कल्याण विभागाने नव्याने मार्गदर्शक सूचना निश्चित केल्या असून, त्यानुसार दिव्यांग उमेदवाराने मागणी केल्यास लेखनिक, वाचक, प्रयोगशाळा सहायक सुविधा देणे संबंधित परीक्षा यंत्रणेस अनिवार्य आहे.


दिव्यांगांना सुविधा देण्यासाठी यापूर्वी ५ ऑक्टोबर २०२१ रोजी परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. त्या परिपत्रकातील सूचनांबाबत परीक्षांचे नियमन करणाऱ्या संस्थांकडून संदिग्धता निर्माण केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सुधारणा केली.


वेगळे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे नाही
अंधत्व, शारीरिक दिव्यांगत्व या दिव्यांगत्वाच्या प्रकारातील लक्षणीय दिव्यांगत्व असलेल्या परीक्षार्थीना त्यांची इच्छा असल्यास लेखनिक, वाचक, प्रयोगशाळा सहायक यांची सुविधा उपलब्ध करून द्यावी. त्यासाठी प्रमाणित केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही, असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता दिव्यांगांना वेगळे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही.


लेखनिकासाठी असे आहेत नवे नियम
लेखनिक, वाचक, प्रयोगशाळा सहायक यांची शैक्षणिक पात्रता परीक्षेसाठी निश्चित केलेल्या शैक्षणिक पात्रतेपेक्षा किमान एका टप्प्याने कमी आणि उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेपेक्षा किमान एका टप्प्याने कमी असावी.


संघटनांच्या तक्रारीची दखल
दिव्यांग कर्मचारी व युवकांच्या संघटनेमार्फत याबाबतच्या सुविधा देण्यासंदर्भातील मागणी शासनस्तरावर अनेकदा करण्यात आली. स्पर्धा परीक्षा दरम्यान दिव्यांगांना त्रास होत असल्याच्या तक्रारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या होत्या.


दिव्यांग परीक्षार्थीना मिळाला मोठा दिलासा
स्पर्धा परीक्षांत दिव्यांग उमेदवारांना सोयीसुविधा मिळणार आहेत. त्यांच्या मागणीनुसार लेखनिक मिळणार असल्याने दिव्यांग उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.


परीक्षा केंद्र शक्यतो तळमजल्यावर ठेवा
दिव्यांगांची परीक्षा तळमजल्यावर, परीक्षा केंद्रे दिव्यांगासाठी सुलभ आणि सुग्रॅम्य असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. दिव्यांग कल्याण विभागाने याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.


प्रत्येक तासामागे किमान २० मिनिटे अतिरिक्त वेळ
दिव्यांग व्यक्तींना लिखाण करताना अडचणी येतात किंवा ज्यांची गती कमी असते त्यांना लेखनिकासोबतच प्रत्येक तासामागे किमान २० मिनिटे अतिरिक्त वेळ देण्यात येणार आहे. त्यामुळे ५ ऑक्टोबर २०२१ रोजीचे परिपत्रक अधिक्रमित करून सुधारित मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.


लेखनिक उपलब्ध न झाल्यास राखीव पॅनल
आपत्कालीन परिस्थितीत लेखनिक, वाचक, प्रयोगशाळा सहायक परीक्षेसाठी उपस्थित राहू न शकल्यास लेखनिक बदलण्याच्या प्रक्रियेत लवचिकता असावी. त्या दृष्टीने परीक्षा यंत्रणेने परीक्षा केंद्रावर राखीव लेखनिकांची व्यवस्था करावी. एका विषयासाठी एकच लेखनिक, वाचक, प्रयोगशाळा सहायक वापरता येईल, अशा विविध सूचना देण्यात आल्या आहेत


"स्पर्धा परीक्षांत दिव्यांग उमेदवारांना मागणीनुसार लेखनिक व सहायक मिळणार आहे. त्यामुळे दिव्यांगांना परीक्षा देताना होणारे शारीरिक व मानसिक त्रास कमी होतील. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो."
- दिगंबर बन्सोड, अध्यक्ष दिव्यांग -कल्याणकारी संघटना गोंदिया 

Web Title: It is mandatory to provide scribes to disabled students on demand; it is not necessary to submit a medical certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.