जेवल्यानंतर लगेच धावत असाल किंवा जड व्यायाम करत असाल तर आजच करा बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 16:50 IST2025-05-08T16:49:45+5:302025-05-08T16:50:30+5:30
आहारासोबत व्यायाम महत्त्वाचा : जेवणानंतर लगेच चालल्यास गॅस, अपचन यासारख्या समस्या

If you are running or doing heavy exercise right after eating, stop today.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बदलत्या वातावरणात आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी आपण निरोगी आहारासोबतच व्यायामदेखील करत असतो. अशातच धावणे हा निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी एक उत्तम व्यायाम आहे. आपल्यापैकी अनेकजण रोज सकाळी लवकर उठून रनिंग करायला जातात. पण, जर ते चुकीच्या वेळी केले गेले, विशेषतः जेवल्यानंतर लगेच तर त्याचे दुष्परिणामदेखील होऊ शकतात. जेवल्यानंतर किती वेळानंतर धावणे आपल्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असू शकते हे अनेकांना जाणून घ्यायचे असते. अशातच तुम्ही जेवल्यानंतर लगेच धावण्यासाठी जात असाल तर त्याने तुमच्या शरीराला नुकसान होऊ शकते.
रात्रीच्या जेवणानंतर चालावे, याने जेवण चांगले पचते असे आपल्याकडे म्हटले जाते. ज्याला आपण शतपावली असे म्हणतो. रात्री केलेल्या जेवणानंतर आपली हालचाल होत नाही. त्यामुळे बाहेर जाऊन फेरफटका मारण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, जेवणानंतर चालल्याने खरंच शरीरावर फरक पडतो का? याचा परिणाम वजनावर होतो का? शतपावलीचा आरोग्याला कितपत फायदा होतो? यासह चालावे तर किती चालावे? असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडला असेल. शास्त्रज्ञांनी जेवणानंतर १५ मिनिटे चालणे रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते. परंतु, जेवणानंतर लगेच चालणे शरीरासाठी कधी कधी फायदेशीर ठरत नाही.
जेवणानंतर तासभराने चालावे
जेवल्यानंतर लगेच व्यायाम करू नये. जेवल्यानंतर लगेच धावल्याने पोटाच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला वेदना होऊ शकतात. जेवल्यानंतर किमान १ ते २ तासांचे अंतर राखले पाहिजे. जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा आपली पचनसंस्था सक्रिय होते आणि शरीरातील बहुतेक रक्तप्रवाह पोटाकडे केंद्रित होतो.
चालण्याचा व्यायाम उत्तम
सर्व प्रकारच्या व्यायामात कोणालाही सहज करता येणारा हा व्यायाम पायातल्या शूजव्यतिरिक्त इतर कुठल्याही साधनाची या व्यायामाला आवश्यकता नसते. चालण्याचा व्यायाम कधी करता, किती वेळ करता, कसा करता यावर त्याचे शरीरावर होणारे परिणाम अवलंबून असतात.
रात्री जेवल्यानंतर चालावे
चालण्याच्या व्यायामाबद्दल नुकताच झालेला एक अभ्यास सांगतो की जर वजन कमी करायचं असेल तर रात्री जेवणानंतर अवश्य चालावं. यामुळे केवळ वजनच कमी होतं असं नाही तर आरोग्यास इतरही प्रकारे त्याचा फायदा होतो. रात्री जेवल्यानंतर चालण्यामुळे आपल्या शरीरातला प्रत्येक भाग आणि स्नायू व्यवस्थित काम करतात. रोज रात्री जेवल्यानंतर किमान १५-२० मिनिटं चाललं तरी स्थूल होण्याचा धोका टळतो.
जेवल्यानंतर लगेच धावल्याने नुकसान
- पचनाच्या समस्या : धावण्यामुळे पचनसंस्थेतील रक्तप्रवाह कमी होतो, ज्यामुळे गॅस, अपचन आणि आम्लता यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
- पेटके आणि पोटदुखीः जेवणानंतर लगेच धावण्यामुळे पोटात पेटके येऊ शकतात, ज्यामुळे धावताना अस्वस्थता निर्माण होते.
- उलट्या किंवा मळमळः विशेषतः जर तुम्ही हेल्दी किंवा प्रथिनेयुक्त जेवण सेवन केले असेल तर लगेच धावल्याने उलट्या किंवा मळमळ सारख्या समस्या उद्भवू शकतात.
- थकवा आणि चक्कर येणेः जेवल्यानंतर, शरीर पचनासाठी ऊर्जा वापरते. जर तुम्ही यावेळी धावलात तर तुम्हाला लवकर थकवा जाणवेल आणि चक्करही येऊ शकते.
- परफॉर्मसवर परिणामः जर तुम्ही फिटनेस किंवा प्रशिक्षणासाठी धावत असाल तर जेवल्यानंतर लगेच धावल्याने तुमचा परफॉर्मस कमी होऊ शकते.