थंड पाणी, कोल्ड्रिंक्स विकत घेतल्यावर कुलिंगचे अधिक पैसे मागितले तर इथे करा तक्रार !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 17:13 IST2025-05-03T17:12:38+5:302025-05-03T17:13:04+5:30
एमआरपीत कुलिंग चार्जेसचा समावेश : काही ठिकाणी अधिक पैसे घेतात

If you are asked to pay more for cooling after purchasing cold water or cold drinks, file a complaint here!
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : उन्हाळा सुरू झाला की, अनेकजण थंड पेय घेतात. मात्र, काही ठिकाणी 'कुलिंग चार्जेस'च्या नावाखाली अतिरिक्त पैसे घेतले जातात. प्रत्यक्षात एमआरपीत कुलिंग चार्जेसचा समावेश असतो. स्थानिक पातळीवर कुलिंगचे अतिरिक्त चार्जेस आकारल्याचे सहसा पाहायला मिळाले नाही. परंतु, कुलिंग चार्जेसच्या नावाखाली अधिकच्या पैशांची मागणी कोणी करत असेल, तर त्याच्याविरुद्ध थेट ग्राहक मंचात तक्रार करता येऊ शकते.
जास्त पैसे मागाल, तर काय कराल?
कोणत्याही कंपनीकडून थंड पेय तयार करताना कुलिंग चार्जेस एमआरपीमध्ये समाविष्ट केले जातात. त्यामुळे ग्राहकांना अतिरिक्त शुल्क देण्याची गरज नसते. मात्र, ग्राहकांच्या अज्ञानाचा फायदा घेत काही दुकानदार अतिरिक्त पैसे मागतात. कुलिंग चार्जेसच्या नावाखाली जास्त पैसे घेतले गेल्यास नागरिकांना ग्राहक मंचाकडे तक्रार करता येते.
कोल्ड्रिंक्स थंड विकणे ही तर जबाबदारी
सध्याच्या उन्हाच्या वाढत्या तापमानात थंड पाण्याची बाटली, कोल्ड्रिंक्सला मागणी वाढली आहे. कोल्ड्रिंक्स थंड विकणे ही दुकानदारांची जबाबदारी आहे. ते कोल्ड्रिंक्स थंड करण्याचे अतिरिक्त पैसे घेऊ शकत नाहीत.
"एखाद्या वस्तूच्या एमआरपीत कुलिंग चार्जेसचा समावेश असतो. कुलिंग चार्जेसच्या नावाखाली अधिकच्या पैशांची मागणी करणाऱ्याविरोधात जिल्हा ग्राहक तक्रार मंचाकडे नागरिक तक्रार करू शकतात."
- अॅड. सतीश घोडे