नगरविकास खाते माझ्याकडे, निधीची कमतरता पडू देणार नाही ! कचरामुक्त, भ्रष्टाचारमुक्त गोंदिया साकारण्याची शिंदेंनी दिली ग्वाही
By अंकुश गुंडावार | Updated: November 25, 2025 15:47 IST2025-11-25T15:45:54+5:302025-11-25T15:47:48+5:30
एकनाथ शिंदे : शिंदेसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ गोंदियात सभा

I have the Urban Development Department, I will not allow any shortage of funds! Shinde assured to make Gondia waste-free, corruption-free
गोंदिया : माझ्याकडे डॉक्टरची पदवी नसली तरी मी पण मोठे ऑपरेशन करतो. मी कोणते मोठे ऑपरेशन केले याची आपल्या सर्वांना चांगलीच कल्पना आहे. अनेकांनी त्याचा अनुभव घेतला असून त्यांची बोलती आता बंद केली आहे. अशी टिका राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता केली.
गोंदिया नगर परिषद निवडणुकीत शिंदेसेनेकडून निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मंगळवारी (दि.२५) येथील इंदिरा गांधी क्रीडा संकुलात आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले राज्यात आता विकास आणि परिवर्तनाचे पर्व सुरु झाले आहे. सर्वसामान्य जीवनात सोन्याचे दिवस आले. विरोधकांचे काम हे केवळ टिका करण्याचेच आहे. त्यांच्याकडे कुठलेच मुद्दे नसल्याने ते लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचे काम करीत आहे. लाडकी बहीण योजना सरकार बंद करेल असे सांगून लाडक्या बहिणींची दिशाभूल करीत आहे. पण कुणीही कितीही प्रयत्न केले. तरी ही योजना बंद होणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. लाडक्या बहिणींना केवळ १५०० रुपयांच्या अनुदानावर थांबविणार नाही तर आत्मनिर्भर व लखपती करणार असल्याचे सांगितले. नगरविकास खाते माझ्याकडेच असून गोंदिया शहरासाठी निधीची कमतरता कधीच पडून देणार नाही. कचरामुक्त, भ्रष्टाचारमुक्त गोंदियाचे स्वप्न साकारण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
मी निधी देतो तो मिळतो की गायब होतो !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यातील प्रत्येक नगरपरिषदेला उद्यानांसाठी प्रत्येकी १ कोटी रुपयांचा निधी दिला. येथील नगर परिषदेला तो मिळाला का? मी निधी देतो तो बरोबर मिळतो की तो देखील गायब होतो असा टोलाही विरोधकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लावला.
खरी शिवसेना कुणाची हे जनतेनेच दाखवून दिले
विधानसभा निवडणुकीत शिंदेसेनेने ८० जागा लढवून ६० जागा जिंकल्या. तर उध्दसेनेला राज्यात ८० जागा लढवून केवळ २० जागा जिंकता आल्या. त्यावरुनच राज्यातील जनतेनेच खरी शिवसेना कोणती याचा फैसला केला आहे. आमची शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारावर चालणारी आहे. त्यांच्या विचारांना बगल देणारी नाही असे सांगत उध्दव ठाकरे यांच्यावर निशाना साधला.