कालसर्प आहे पूजा करून देतो.. उपचाराच्या नावाखाली तरुणीवर अत्याचार; ढोंगीबाबास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2022 17:09 IST2022-06-07T17:00:02+5:302022-06-07T17:09:42+5:30
या प्रकरणी तिरोडा पोलिसांनी ढोंगीबाबाला अटक केली आहे.

कालसर्प आहे पूजा करून देतो.. उपचाराच्या नावाखाली तरुणीवर अत्याचार; ढोंगीबाबास अटक
सुकडी-डाकराम : कालसर्प असल्याने त्याची पूजा करून देतो असे सांगून २१ वर्षीय तरुणीचा विनयभंग व अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तिरोडा पोलिसांनी ढोंगीबाबाला अटक केली आहे. दिगांबर राजेंद्रप्रसाद तिवारी (७२, रा. एकोडी) असे त्या ढोंगीबाबाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, तरुणीची प्रकृती मागील २ महिन्यांपासून बरी नसल्याने आईवडिलांनी तिला दिगांबर तिवारी याच्याकडे नेले होते. यावर तिवारीने तरुणीला कालसर्प असून ते बरे करून देण्यासाठी पूजा करावी लागणार असे सांगितले. तसेच तिला शनिवारी (दि.४) कवलेवाडा नदीघाट येथे बोलाविले. तिच्या आईवडिलांना वेगळे ठेवून अगोदर तरुणीला नदीत आंघोळ करायला लावली व त्यानंतर तरुणीचा विनयभंग व अत्याचार केला.
याप्रकरणी तरुणीने तिरोडा पोेलिसांत तक्रार दिल्यानंतर सोमवारी (दि.६) हा प्रकार उघडकीस आला. यावर पोलिसांनी तिवारीवर भादंवि कलम ३५४, ३५४(अ), ३५४ (ब), ३७६(अ), सहकलम ३(२), (व्हीए) अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा सहकलम महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा व जादूटोना प्रतिबंधक कलम ३(२)(३)अन्वये गुन्हा नोंद करून अटक केली आहे. याप्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे करीत आहेत.