जि.प. शाळांमध्ये कसे घडणार विद्यार्थी, गोंदियात शिक्षकांची ६५५ पदे रिक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 18:56 IST2025-08-11T18:47:31+5:302025-08-11T18:56:21+5:30
शाळांच्या इमारती जीर्ण, भौतिक सुविधांचा अभाव : प्रफुल्ल पटेल यांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

How will students be taught in ZP schools, 655 posts of teachers are vacant in Gondia
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात जि.प.च्या एकूण १०३४ शाळा असून, यामध्ये ८९ हजार १५६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांचे ७०० पदे रिक्त आहेत. तर जि.प. शाळांच्या इमारतीसुद्धा जीर्ण झाल्या असून जीव धोक्यात टाकून विद्यार्थी शिक्षण घेत आहे. त्यामुळे जि.प. शाळांमध्ये विद्यार्थी घडणार कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या अडचणी त्वरित दूर करण्यात याव्यात, यासंबंधीचे पत्र खा. प्रफुल्ल पटेल यांच्या वतीने जि.प. उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांनी राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांना बुधवारी (दि.६) ते जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता दिले.
गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील वर्ष २०२५-२६ मध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सद्यःस्थितीत प्राथमिक शिक्षण विभागात ६० मुख्याध्यापक, ३५ पदवीधर शिक्षक, ५६० सहायक शिक्षक अशा एकूण ६५५ जागा रिक्त आहे. तसेच माध्यमिक व कनिष्ठ विद्यालयातसुद्धा मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषद गोंदिया शिक्षण विभाग कार्यालयात प्राथमिक व माध्यमिक अधिकारी पद, दोन्ही उपशिक्षणाधिकारी पद, लेखाधिकारी पोषण १, शिक्षण विस्तार अधिकारी ३, वरिष्ठ सहायक ५ व कनिष्ठ सहायकाचे १ पद रिक्त असल्याने याचा दैनंदिन कामावर परिणाम होत आहे. जिल्ह्यातील जि.प.अंतर्गत १०१२ प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा असून २२ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय असे एकूण १०३४ शाळा व विद्यालय आहे. या शाळांमधील विद्यार्थ्यांची एकूण पटसंख्या ८९,१५६ असून विद्यार्थ्यांना बसण्यासाठी डेस्क बेंच व इतर साहित्य नसल्याने शिक्षण घेण्यात अडचणी निर्माण होत आहे. डेस्क बेंच व इतर साहित्य खरेदीकरिता १४ कोटी रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव शिक्षण विभाग, जि.प. कडून शासनाला पाठविला आहे.
जिल्हा वार्षिक योजना वर्ष २०२५-२६ मध्ये शिक्षण विभाग, जि.प. गोंदिया यांनी २९ कोटी ७३ लक्ष रुपये नियोजन समितीकडे मागणी केली आहे. त्यापैकी १४ कोटी ३० लक्ष रुपये 3 मंजूर केले आहे. गोंदिया जिल्हा आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त असून भौगोलिक क्षेत्र मोठे आहे.
निकषाप्रमाणे प्रत्येक गावामध्ये त्यामुळे राज्य शासनाच्या शाळा असून काही शाळेच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे ही बाब लक्षात घेता जिल्हा नियोजन समितीत यासाठी १५ कोटी ४३ लाख रुपयांचा निधी वाढवून देण्यात यावा, अशी मागणीसुद्धा खा. प्रफुल्ल यांनी पत्रातून केली आहे.
"जिल्ह्यात शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. तर दुसरीकडे भौतिक सुविधांचा अभाव आहे. जुन्या इमारती कोसळण्याच्या स्थितीत आहेत. अशात शासनाने इमारती आणि शैक्षणिक साहित्य, तसेच भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. नवीन शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करून रिक्त पदे भरण्यात यावीत."
- सुरेश हर्षे, जि.प. उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती