धक्कादायक! आजीच्या मागे मागे गेला अन चिमुकला नातू विहिरीत पडला

By अंकुश गुंडावार | Updated: December 14, 2023 17:05 IST2023-12-14T17:05:14+5:302023-12-14T17:05:57+5:30

परसटोला वॉर्ड क्र.१७ येथील घटना : तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू.

grandmother followed and the little grandson fell into the well in gondia | धक्कादायक! आजीच्या मागे मागे गेला अन चिमुकला नातू विहिरीत पडला

धक्कादायक! आजीच्या मागे मागे गेला अन चिमुकला नातू विहिरीत पडला

देवरी : विहिरीवरून पाणी आणण्यासाठी गेलेल्या आजीच्या मागे मागे चिमुकला नातूही गेला. दरम्यान विहिरीवरुन पाणी भरून परत येत असताना चिमुकला नातू मागे मागे येत असताना विहिरीत पडला. यात तीन वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.१४) सकाळी १० वाजता येथील वॉर्ड क्रमांक १७ परसटोला येथे घडली. साहिल जितलाल कुंभरे (३) असे विहिरीत पडून मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.  

प्राप्त माहितीनुसार परसटोला येथील रहिवासी जीतलाल कुंभरे यांच्या घराच्या मागे शेताला लागून विहीर बऱ्याच वर्षांपूर्वी खोदण्यात आली होती. या विहिरीला कोणत्याच प्रकारचे सुरक्षा कठडे किंवा तोंडी नव्हती. साहिलची आजी पाणी आणण्यासाठी गुरुवारी (दि.१०) सकाळी विहिरीवर गेली असता तिच्या मागे मागे साहिलसुद्धा विहिरीकडे गेला. आजीचे गुंडामध्ये पाणी भरून झाल्यावर ती घराकडे परत जात असताना तिला वाटले की साहिल तिच्या मागे मागे येत आहे; परंतु साहिल हा विहिरीत पडला होता. जेव्हा आजीने मागे वळून बघितले तेव्हा साहिल दिसला नाही. तेव्हा तिने आरडाओरड केली असता साहिल विहिरीत पडला असल्याचे निदर्शनास आले. 

दरम्यान नागरिकांनी या घटनेची माहिती देवरी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले व साहिलचा मृतदेह विहिरीबाहेर काढला. याप्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास देवरी पोलिस करीत आहेत.

Web Title: grandmother followed and the little grandson fell into the well in gondia