व्हॉट्सॲप स्टेटसवर 'गुडबाय', काही तासांत गळफास : गंगाझरी जंगलात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By नरेश रहिले | Updated: June 23, 2025 19:50 IST2025-06-23T19:50:22+5:302025-06-23T19:50:50+5:30
गोंदियात युवकाची आत्महत्या : सोशल मीडियावर 'गुडबाय'ची पोस्ट ठरली अखेरची

'Goodbye' on WhatsApp status, hanged within hours: Youth commits suicide by hanging in Gangajari forest
गोंदिया : गंगाझरी लगतच्या जंगलात तरुणाने सोशल मीडियावर ‘गुडबाय’ असा संदेश देत गळफास घेऊन आपलं जीवन संपविल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (दि. २२) सायंकाळी ६:३०च्या दरम्यान घडली. प्रतीक राजकुमार वासनिक (२४, रा. रावणवाडी), असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीकने रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर आत्महत्येचा संकेत देणारा संदेश पोस्ट केला. त्यानंतर तो मोबाइल घेऊन घरातून निघून गेला. संध्याकाळपर्यंत घरी न परतल्याने नातेवाइकांनी शोध सुरू केला. सायंकाळी ६:३०च्यादरम्यान गंगाझरी गावालगतच्या जंगलात त्याचा मृतदेह झाडाला दोरीने लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच गंगाझरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला. गंगाझरी पोलिसांनी या घटनेसंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. प्रेम प्रकणातील नैराश्यामुळे त्याने आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे पोलिस तपासात पुढे येत आहे. पुढील तपास पोलिस हवालदार श्यामकुमार देशपांडे करीत आहेत.