'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज मंजूर होण्यात गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 15:24 IST2024-08-06T15:21:00+5:302024-08-06T15:24:16+5:30
२ लाख ६८ हजार मंजूर : १२ हजार २९ बहिणींचे अर्ज झाले रद्द

Gondia district top in the state in approving applications for 'Ladki Bahin' scheme!
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्य शासनाच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत जिल्ह्यातील २ लाख ८८ हजार ९१५ बहिणींनी अर्ज केले होते. यापैकी २ लाख ६८ हजार ९१५ महिलांचे अर्ज मंजूर झाले आहे. याचे लाडक्या बहिणींना मोबाइलवर संदेश देखील प्राप्त झाले असून, दाखल केलेल्या अर्जापैकी सर्वाधिक अर्ज मंजूर होण्यात गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी कागदपत्रांची जुळवाजुळव करुन अर्ज ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज दाखल केले. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत आहे. तर रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यावर दोन महिन्यांचे ३ हजार रुपयांचे अनुदान जमा करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. त्यामुळे सध्या या योजनेचे युद्धपातळीवर केले जात आहे.
जिल्हा महिला व बालकल्याण विभागाची संपूर्ण यंत्रणा यात गेल्या महिनाभरापासून व्यस्त आहे. जवळपास साडेचार हजारांवर कर्मचारी यात परिश्रम घेत आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील २ लाख ८८ हजार ९१५ लाडक्या बहिणींनी अर्ज दाखल केले होते. यापैकी २ लाख ६८ हजार ३१५ अर्ज मंजूर करण्यात आले आहे. तर १२ हजार २९ अर्ज अर्जातील विविध त्रुटींमुळे रद्द करण्यात आले. विशेष म्हणजे, अर्जाचे हे आकडे केवळ ग्रामीण भागाचे आहे.
शहरातील अर्जाचा यात समावेश नाही. दाखल केलेल्या अर्जापैकी जिल्ह्यातील ९३ टक्के लाडक्या बहिणींचे अर्ज मंजूर झाले असून, सर्वाधिक अर्ज मंजूर होण्यात गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. तर दुसऱ्या क्रमांक अकोला आणि तिसऱ्या क्रमांकावर रायगड जिल्हा आहे.
प्रशासनाची जनजागृती, अंमलबजावणी
लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहता कामा नये, यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे व्यापक जनजागृती आणि योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळेच सर्वाधिक अर्ज मंजूर होण्यात जिल्हा अव्वल ठरला आहे.
"एकही पात्र लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी जि. प. प्रशासनाच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भरपूर मेहनत घेतली. व्यापक स्वरूपात जनजागृती केली. त्यामुळेच सर्वाधिक अर्ज मंजूर होण्यात जिल्हा राज्यात टॉप ठरला आहे."
-एम. मुरगानंथम, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. गोंदिया