सभापती भाजपचेच; राष्ट्रवादीला ठेवले दूर, ३९ विरुद्ध १३ असे झाले मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 22:57 IST2025-02-10T22:57:33+5:302025-02-10T22:57:56+5:30

जि.प.विषय समिती सभापती निवडणूक

Gondia All Four BJP members were appointed as chairmen of Zilla Parishads | सभापती भाजपचेच; राष्ट्रवादीला ठेवले दूर, ३९ विरुद्ध १३ असे झाले मतदान

सभापती भाजपचेच; राष्ट्रवादीला ठेवले दूर, ३९ विरुद्ध १३ असे झाले मतदान

गोंदिया : जिल्हा परिषदेच्या चार विषय समिती सभापतीपदासाठी सोमवारी निवडणूक घेण्यात आली. चारही सभापतीपदी भाजपचेच सदस्य विराजमान झाले. तर जि.प.अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीतील फार्म्यूला या निवडणुकीत न वापरल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सभापतीपदापासून दूर राहावे लागले. त्यामुळे सभापतीपदावर भाजपचेच वर्चस्व कायम राहिले.

जिल्हा परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सत्ता आहे. अध्यक्षपद भाजपकडे तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. तर अडीच वर्षापुर्वीप्रमाणेच विषय समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत तीन सभापतीपद भाजप आणि एक राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिल असे सांगितले जात होते. पण सोमवारी झालेल्या सभापतीपदाच्या निवडणुकीत वेगळेच चित्र पाहयला मिळाले. जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात झालेल्या सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपचे चारही उमेदवार विजयी झाले. काँग्रेसच्या उमेदवारांना प्रत्येकी १३ तर भाजपच्या उमेदवारांना ३९ मते मिळाली. मुंडीपार गटाचे जि.प.सदस्य डाॅ. लक्ष्मण भगत व पिंडकेपार जि.प.गटाच्या दिपा चंद्रिकापूरे, इटखेडा गटाच्या अपक्ष जि.प.सदस्य पौर्णिमा ढेंगे महिला बालकल्याण सभापती पदी तर समाजकल्याण सभापती पदावर तिरोडा तालुक्यातील सरांडी जि.प.गटाच्या रजनी कुंभरे या निवडून आल्या. विशेष म्हणजे भाजपचे अर्जुनी गटाचे जि.प.सदस्य चत्रुभूज बिसेन यांनी प्रकृतीचे कारण देत मतदानाचा हक्क न बजाविल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. निवडणूक अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत व सहयोगी अधिकारी म्हणून जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुतीरकर यांनी काम पाहिले.

राष्ट्रवादीकडून आधी अर्ज नंतर माघार

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महिला बालकल्याण विषय समितीकरीता नेहा केतन तुरकर व इतर दोन विषय समितीकरीता किरण पारधी व जगदीश बावनथडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता. या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसने नंतर नमते घेत दाखल केलेले ३ विषय समितीचे उमेदवारी अर्ज मागे घेतले. तर काँग्रेसकडून समाजकल्याण विषय समितीकरीता उषा शहारे, महिला बालकल्याण समितीकरीता विमल कटरे व इतर दोन विषय समितीकरीता जितेंंद्र कटरे व छाया नागपूरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. काँग्रेसच्या सदस्यांनी अर्ज कायम ठेवल्याने निवडणूक घेण्यात आली. यात भाजपच्या चारही उमेदवारांना ३९ मते तर काँग्रेसच्या उमेदवारांना प्रत्येकी १३ मिळाली.

भंडाऱ्यांचे पडसाद गोंदियात

भंडारा जिल्हा परिषद विषय समितीच्या झालेल्या राजकीय घडामोडींचे पडसाद सोमवारी गोंदिया जि.प.च्या विषय समिती निवडणुकीत उमटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. वरिष्ठांच्या आदेशावर अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवडणूक एकत्र लढले. पण सोमवारी झालेल्या विषय समिती निवडणुकीत भाजपने बहुमताच्या बळावर राष्ट्रवादीला मात्र दूर ठेवल्याचे बोलल्या जाते. विषय समिती वाटप करतांना उपाध्यक्षाकडे आरोग्य व शिक्षण हे पद कायम राहते की कृषी व पशुसंवर्धन हे दिले जाते याकडे लक्ष लागले आहे.

आमगाव-देवरी क्षेत्राला संधी नाही

आमगाव-देवरी मतदारसंघातून भाजपचे हनवंत वट्टी, किशोर महारवाडे हे सदस्य असताना या दोन्ही सदस्यांना मात्र पुर्ण कालावधीत संधी मिळू शकली नाही. दुसऱ्या टप्प्यात आमगाव-देवरी क्षेत्राला सभापतीपदाची संधी मिळाली नाही.

बांधकाम, शिक्षणवर लक्ष

विषयी समिती सभापतीपदाची निवडणूक सोमवारी पार पडली. यानंतर अध्यक्षांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या बैठकीत तीन सभापतींना खाते वाटप केले जाणार आहे. यात अर्थ व बांधकाम आणि शिक्षण व आरोग्य हे खाते कुणाला मिळते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या असून हे दोन्ही विभाग महत्वपुर्ण आहेत.

राम लक्ष्मणाची जोडी
जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर आणि जि.प.सदस्य लक्ष्मण भगत यांची मैत्री सर्वश्रृत आहे. सोमवारी पार पडलेल्या निवडणुकीत लक्ष्मण भगत यांची सभापतीपदी निवड करण्यात आली. त्यामुळे जि.प.मध्ये या दोघांच्या रुपाने राम लक्ष्मणाची जोडी पाहयला मिळणार अशी चर्चा या निवडणुकीनंतर होती.

Web Title: Gondia All Four BJP members were appointed as chairmen of Zilla Parishads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.