वीज खांब चोरी करणारी टोळी जेरबंद

By अंकुश गुंडावार | Updated: March 8, 2025 19:01 IST2025-03-08T19:01:18+5:302025-03-08T19:01:51+5:30

गॅस कटरने कापून नेत होते : नागपूर येथील आहेत तिघे आरोपी

Gang of electricity pole thieves arrested | वीज खांब चोरी करणारी टोळी जेरबंद

Gang of electricity pole thieves arrested

गोंदिया : वीज वितरणासाठी लावण्यात आलेले वीज खांब चोरून नेणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणात तीन आरोपींना नागपूर येथून शनिवारी (दि. ८) अटक केली आहे. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात चोरीचा मालही मिळून आला आहे.

मुंबई येथील पॉलीकॅप इंडिया लिमिटेड या कंपनीकडून कंत्राटी पद्धतीने बिर्सी (नायरा पेट्रोल पंप जवळ) ते मेंढा रस्त्याच्या बाजूला १६ वीज खांब ६ नोव्हेंबर २०२४ रोजी उभारण्यात आले होते. त्यानंतर तक्रारदार प्रतापसिंह ठाकूर यांचे पर्यवेक्षक अमरकंठ झेलकर (रा. रोहा, जिल्हा भंडारा) यांनी ७ व ८ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी कामाची पाहणी केली असता गाडलेल्या १६ लोखंडी वीज खांबांपैकी एक लाख २५ हजार रुपये किमतीचे १५ खांब गॅस कटरने कापून नेल्याचे दिसून आले. प्रकरणी ठाकूर यांच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिस ठाण्यात भान्यासं २०२३ कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातच तिरोडा हद्दीत अशाच प्रकारे आणखी वीज खांब चोरीला गेल्याने परत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात पथक करीत होते व त्यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला. प्रकरणात गोपनीय माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने खात्रीशीर माहिती काढून बसंतलाल चुनबाद साहू, अशिष देवीदयाल साहू व सुंदरलाल गुड्डु साहू (तिघे, रा. नागपूर) यांना नागपूर येथून पथकाने ताब्यात घेतले. तिघांची सखोल विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.

१४.२० लाख रुपयांचा माल जप्त

पथकाने आरोपींच्या ताब्यातून चोरी केलेले वीज खांबांचे ४३ लहान-मोठ्या आकाराचे तुकडे किमत एक लाख ९२ हजार ७१५ रुपये, एक निळ्या व लाल रंगाचा इंडेन कंपनीचा गॅस सिलिंडर अंदाजे किमत चार हजार रुपये, एक लोखंडी ऑक्सिजन सिलिंडर किंमत १२ हजार रुपये, एक लाल व निळ्या रंगाचा गॅस कटर पाइप नोझलसह किमत दोन हजार रुपये, एक टाटा कंपनीचा जुना वापरता ट्रक (एमएच १२- एफझेड ३६७१) किंमत १२ लाख रुपये, एक मोबाईल हँडसेट असा एकूण १४ लाख २० हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना तिरोडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, पुढील तपास तिरोडा पोलिस करीत आहे.

Web Title: Gang of electricity pole thieves arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.