जनावरांची तस्करी करणाऱ्या चौघांना चार जिल्ह्यांतून केले तडीपार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 20:19 IST2025-08-05T20:18:58+5:302025-08-05T20:19:41+5:30
आमगाव पोलिसांची धाडसी कारवाई : चार जिल्ह्यांतून तीन महिन्यांसाठी तडीपार

Four people involved in animal smuggling deported from four districts
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील आमगाव पोलिस ठाणे हद्दीतील अवैध गोवंश वाहतूक व गोमांस विक्री करणाऱ्या एका टोळीतील चार सदस्यांना आमगाव पोलिसांनी वारंवार पकडूनही त्यांच्या कृत्यात सुधारणा न आल्यामुळे चौघा जनावर तस्करांना तब्बल तीन महिन्यांसाठी चार जिल्ह्यांतून तडीपार करण्यात आले आहे.
वसिम नासिर कुरैशी (३४), समीर नासिर कुरैशी (२९), सफिक शरिफ कुरैशी (४५) व दानिश सफिक कुरैशी (२२, सर्व रा. कुंभारटोली, ता. आमगाव) अशी तडीपार करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या टोळीतील आरोपी सराईतपणे अवैधरीत्या गोवंश वाहतूक व गोमांस विक्री करीत असल्याची माहिती प्राप्त झाल्यावर त्यांच्यावर वेळोवेळी आमगाव पोलिसांनी धाड घालून गुन्हे दाखल केले आहेत. या सराईत आरोपींच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्याकरिता तसेच करीत असलेल्या गुन्ह्याला प्रतिबंध करण्याकरिता महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ कलम ५५ प्रमाणे तडीपार करण्यात आले.
यांनी केली कारवाई
तडीपारची कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात आमगाव पोलिस निरीक्षक तिरुपती अशोक राणे, स्थानिक गुन्हे शाखे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहिरकर, आमगाव गुन्हे प्रकटीकरण पथकातील हवालदार दुधराम मेश्राम, असिम मन्यार, विनोद उपराडे, शिपाई चेतन शेंडे, नितीन चोपकर, दिनेश वानखडे, भागवत कोडापे, मिलनसिंह मंजुटे, महिला पोलिस हवालदार यशोदा भोयर, विनिशा बहेकार यांनी केली आहे.
या आरोपींवर १० गुन्ह्यांची नोंद
जनावरांची तस्करी करणे व इतर असे १० गुन्हे या आरोपींवर असल्याने ते समाजासाठी घातक असल्याचे ठरवीत त्यांना महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ५५ अन्वये गोंदिया, भंडारा, गडचिरोली व मध्यप्रदेशातील बालाघाट येथून तीन महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे.