कष्टाची फुले, वीटभट्टी मजुराची मुलगी झाली सहायक अभियंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 17:34 IST2025-01-17T17:33:26+5:302025-01-17T17:34:13+5:30
कठीण परिस्थितीवर केली मात: गावकऱ्यांसमोर ठेवला आदर्श

Flowers of hard work, the daughter of a brick kiln worker became an assistant engineer
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : 'लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालो की कभी हार नहीं होती' या ओळींप्रमाणे अनेक संकटांचा सामना करीत व कठीण परिस्थितीवर मात करून वीट भट्टीवर मोलमजुरी करणाऱ्या मजुराची मुलगी सहायक अभियंतापदी रुजू झाली. शिल्पा गुलाब धारगावे असे त्या तरुणीचे नाव आहे.
शिल्पाचे दहावीपर्यतचे शिक्षण मानवता विद्यालय बोंडगावदेवी येथे झाले. घरात अठराविश्व दारिद्रय, आई विटा भट्टीवर मजुरी करायची, घरची परिस्थिती हलाखीची असल्याने तिचे शिक्षण चान्ना बाक्टी येथे तिची मावशी रत्नमाला रामचंद्र हुमणे यांच्याकडे झाले. अतिशय कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर तिने पॉलिटेक्निकचे शिक्षण पूर्ण केले. येथेच ती थांबली नाही तर उच्च शिक्षणाची ओढ असल्याने जिद्दीने तिने अमरावती येथे विद्युत अभियंता पदवीचे शिक्षण पूर्ण केले. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने तिने नोकरी शोध घेतला.
इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड हैदराबाद येथे टेक्निकल ऑफिसर म्हणून काम केले. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द तिला थांबू देत नव्हती. पुढे तिने सरकारी नोकरी मिळविण्यासाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. सुरुवातीला अपयश आले; पण ती खचली नाही. तिने आपले प्रयत्न सुरूच ठेवले. नुकत्याच जाहीर झालेल्या महावितरणच्या परीक्षेत शिल्पाची सहायक अभियंतापदी निवड झाली. तिच्या नियुक्तीचा कुटुंबीयासह गावकऱ्यांनी सुध्दा आनंद व्यक्त केला. शिल्पाने यशाचे श्रेय आई रमा, वडील गुलाब धारगावे, रामचंद्र हुमने व रत्नमाला हुमने यांना दिले.
प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा
दृढ निश्चय, जिद्द, इच्छाशक्ती व सातत्यपूर्ण प्रयत्नातून यश संपादन करता येते. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना अपयश आले तर खचून जाऊन नका, प्रयत्नात सातत्य ठेवा निश्चित यश मिळते, असा सल्ला शिल्पाने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला आहे.