लोकार्पणापूर्वीच गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गाची स्लोपिंग खचली : ५४७ कोटी रुपयांचा खर्च पाण्यात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 14:18 IST2025-07-19T14:16:52+5:302025-07-19T14:18:02+5:30

काही अंडरपास पुलांना भेगा, पावसाळ्यात झाली दुर्दशा : बांधकामाच्या गुणवत्तेवरच प्रश्न,

Even before the inauguration, the slope of Gondia-Balaghat National Highway collapsed: Rs 547 crore spent in water? | लोकार्पणापूर्वीच गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गाची स्लोपिंग खचली : ५४७ कोटी रुपयांचा खर्च पाण्यात?

Even before the inauguration, the slope of Gondia-Balaghat National Highway collapsed: Rs 547 crore spent in water?

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :
गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४३च्या ४१.२१ किमी रस्त्याचे काम सध्या सुरू असून, सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, लोकार्पणाआधीच महामार्गाची स्लोपिंग खचली असून, काही अंडरपास पुलांना भेगा पडल्या आहेत, त्यामुळे या रस्त्याच्या गुणवत्तेबाबत शंका व्यक्त केल्या जात आहेत.


केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या भारतमाला योजनेंतर्गत मंजूर झालेल्या या चौपदरी महामार्गाचे काम जानेवारी २०२६ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. एकूण १,१०६ कोटी रुपयांच्या या प्रकल्पांतर्गत, बालाघाट-गोंदिया मार्गासाठी सुमारे ५४७ कोटी रुपये खर्च होणार आहेत. बालाघाट-गोंदिया राष्ट्रीय महामार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले असून, काही ठिकाणी किरकोळ कामे शिल्लक आहेत.


महामार्गावर २ आरओबी आणि २१ अंडरपास असून, त्यांचेही काम जवळपास पूर्ण झाले आहे. या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला स्लोपिंग तयार करण्यात आली आहे. मात्र, दहा दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे भंभोळी आणि रजेगावजवळील काही भागात तडे गेले आहेत, तर काही स्लोपिंग वाहून गेली आहे. तसेच, महामार्गालगत बांधण्यात आलेले गॉगलई येथील बसस्थानकसुद्धा खचण्याच्या मार्गावर आहे.


स्लोपिंग दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर
पहिल्याच पावसात स्लोपिंग खचल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयावर आणि कामाच्या दर्जावर तीव्र टीका सुरू झाली आहे. त्यावर संबंधित कंत्राटदाराने १५ ते २० जेसीबी आणि पोकलेन मशीनच्या साहाय्याने स्लोपिंग दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. 


बांधकाम कंपनी हरियाणाची

  • बालाघाट-गोंदिया राष्ट्रीय महामार्गाचे काम मुदतीच्या आधीच पूर्ण होत आहे.
  • त्यामुळे या महामार्गाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची एक चमू चार पाच दिवसांपूर्वी येणार होती.
  • मात्र त्यापूर्वीच महामार्गालगतची स्लोपिंग खचल्याने ही समिती आली नाही. दरम्यान स्लोपिंग खचल्याने हरियाणा येथील कालू वालिया यांच्या बांधकाम कंपनीमागे आता चौकशीचा ससेमिरा लागला आहे.
  • त्यामुळे कंपनीला मिळणारा १६ कोटी रुपयांचा बोनस संकटात आला आहे.


 

Web Title: Even before the inauguration, the slope of Gondia-Balaghat National Highway collapsed: Rs 547 crore spent in water?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.