स्त्री रुग्णालयात 'नॉर्मल' डिलिव्हरी, तर खासगी रुग्णालयात 'सिझेरियन'वर भर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 16:29 IST2024-10-21T16:28:46+5:302024-10-21T16:29:59+5:30
गर्भधारणेनंतर घ्या संतुलित आहार : तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार

Emphasis on 'normal' delivery in women's hospitals, and 'Caesarean' in private hospitals
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात होणाऱ्या प्रसूतींमध्ये नॉर्मल प्रसूती करण्यावर वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांनी भर दिला आहे. महिन्याकाठी होणाऱ्या ५५० वर प्रसूतींमध्ये ४०० वर प्रसूती नॉर्मल होतात. गर्भधारणेनंतर महिलांनी स्वतःचे आरोग्य व आहाराकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे
तज्ज्ञांच्या सल्ल्याने नियमित तपासणी, औषधोपचार आणि सकस आहार घेतला, तर प्रसूतीदरम्यान समस्या निर्माण होत नाहीत; परंतु अनेक महिला याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे प्रसूतीदरम्यान शारीरिक समस्या निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी माता आणि बालकांच्याही आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.
सिझरचा सल्ला कधी दिला जातो?
गर्भामध्ये बाळाचा दम कोंडणे, आईचा बीपी वाढणे, गर्भपिशवीच्या तोंडाला समस्या निर्माण होणे, पोटात शी करणे आदी कारणांनी सिझरचा सल्ला दिला जातो.
पहिली सिझेरियन, दुसरी नॉर्मल होते का?
प्रसूतीवेळी महिलांमध्ये काही शारीरिक समस्या निर्माण झाल्या, तर माता आणि बालकाचे प्राण वाचविण्यासाठी सिझेरियन डिलिव्हरी करण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिला जातो. प्रथम प्रसूतीवेळी सिझेरियन झाले असेल, तर दुसरी प्रसूती नॉर्मल होण्याचे प्रमाण ३० टक्क्यांच्या जवळपास आहे; ; परंतु नंतरही प्रसूतीवेळी शारीरिक समस्या उद्भवल्या, तर सिझेरियन करावे लागते.
प्रसूतीची आकडेवारी काय सांगते?
महिना नॉर्मल सिझर एकूण
एप्रिल ४१५ ९० ५०५
मे ४३८ ७८ ५१६
जून ४०४ ८० ४८४
जुलै ३७८ ७० ४४८
ऑगस्ट ३५१ ६० ४११
सप्टेंबर ४११ ९० ५०१
नॉर्मल प्रसूती करण्यावर अधिक भर
"जिल्हा स्त्री रुग्णालयात अधिकाधिक महिलांची नॉर्मल प्रसूती व्हावी, याकडे लक्ष दिले जाते. शारीरिक समस्या निर्माण झाल्या तर सिझेरियन करावे लागते. या सिझेरियनची गरज उद्भवू नये, यासाठी गर्भधारणेनंतर महिलांनी आवश्यक दक्षता घ्यावी."
- डॉ. निकीता पोयाम, अधीक्षक, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय, गोंदिया.