'डिजीलॉकर'मध्ये आता मिळणार विजेची बिले; कसे उपलब्ध होईल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 18:03 IST2025-06-16T18:02:00+5:302025-06-16T18:03:03+5:30
लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन : ५२ कोटी जणांकडून डिजीलॉकरचा वापर

Electricity bills will now be available in 'DigiLocker'; How will it be available?
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला अशी महत्त्वाची कागदपत्रे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सुरक्षित ठेवण्यासाठी हल्ली सर्वजण डिजीलॉकर या ऑनलाइन सुविधेचा लाभ घेतात. आता या डिजीलॉकरमध्ये महावितरणने ग्राहकांसाठी वीजबिलेही उपलब्ध करून दिली आहेत. या सुविधेचा लाभ वीज ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे. या सुविधेमुळे वीज ग्राहकांना आपल्या मोबाइल फोनमध्ये डिजीलॉकर अॅपमध्ये महत्त्वाच्या दाखल्यांसोबतच विजेची बिलेही उपलब्ध होणार आहेत.
डिजीलॉकरमध्ये कसे वीजबिल उपलब्ध होईल
वीज ग्राहकांनी आपल्या डिजीलॉकर अॅपमध्ये गेल्यानंतर महावितरण वीज कंपनीची निवड करावी, यामध्ये वीज ग्राहक क्रमांक दाखल करण्याची कृती एकदाच करायची आहे. त्यानंतर त्यांना आपल्या डिजीलॉकरमध्ये विजेचे चालू महिन्याचे बिल उपलब्ध होईल.
डिजीलॉकर केंद्र सरकारचा महत्त्वाचा उपक्रम
डिजीलॉकर हा केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने डिजिटल इंडिया कार्यक्रमाच्या अंतर्गत सुरू केलेला उपक्रम आहे. याद्वारे वापरकर्ते आपले पॅनकार्ड, वाहन नोंदणी कागदपत्रे, रेशनकार्ड, दहावी मार्कशीट, बारावी मार्कशीट, निवासाचा दाखला असे अनेक दस्तऐवज अॅपमध्ये सुरक्षित ठेवू शकतात आणि गरजेनुसार त्यांचा वापर करता येतो.
डिजीलॉकरमध्ये ८५९ कोटी कागदपत्रे सुरक्षित
देशात आतापर्यंत ५२ कोटी ८९ लाख नागरिकांनी डिजीलॉकरचा वापर सुरू केला असून, त्यांनी त्यात ८५९ कोटी कागदपत्रे ठेवली आहेत. माहिती-तंत्रज्ञान कायदा २०००च्या नियमावलीनुसार डिजीलॉकरमधील दस्तऐवज मूळ कागदी प्रत्यक्ष दाखल्याच्या समान समजले जातात व त्याला कायदेशीर दर्जा असल्याची माहिती आहे.