२० रुपयांत दोन लाखांचा विमा तुम्ही काढला का ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 15:41 IST2024-06-11T15:40:42+5:302024-06-11T15:41:25+5:30
सर्वसामान्यांना योजना लाभदायक : बँक खातेधारक घेत आहेत लाभ

Did you take out an insurance of two lakhs for Rs 20?
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : केंद्र शासनाच्या वतीने २०१५ पासून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना राबविली जात आहे. त्याअंतर्गत वार्षिक २० रुपयांत दोन लाखांचा विमा दिला जातो. प्रत्येक राष्ट्रीयीकृत बँकांकडून या योजनेसाठी अर्ज दाखल केला जाऊ शकतो. प्रतिदिवसासाठी केवळ पाच पैसे अशा दराने विमा खर्च होत असल्याने सर्वसामान्यांसाठी ही योजना लाभदायक ठरत आहे.
२० रुपयांत दोन लाखांचा विमा
जेव्हा ही पीएम सुरक्षा योजना सुरू केली होती तेव्हा वार्षिक १२ रुपये प्रीमियम घेतला जात होता. त्यात आता वाढ झाली असून, या योजनेसाठी वार्षिक २० रुपये प्रीमियम घेतला जात आहे. या योजनेंतर्गत अपघाती मृत्यू झाल्यास किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास विमाधारकास दोन लाखांचा विमा मिळतो. लाभ घेण्यासाठी प्रत्येक वर्षी नूतनीकरण करणे आवश्यक आहे.
एकावेळीच विमा
■ एकाच व्यक्तीचे चार-पाच बचत बँक खाते असते. त्यामुळे पीएम सुरक्षा विमा योजनेसाठी कोणत्याही एकाच बँकेतून विमा योजनेसाठी अर्ज करता येतो. १८ ते ७० वय असणारे नागरिक या विमा योजनेसाठी पात्र ठरतील.
काय आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना?
■ प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ९ मे २०१५ रोजी सुरू करण्यात आली. जे नागरिक विम्याच्या कक्षेत आले नाहीत त्यांना विमा मिळावा यासाठी ही योजना सुरू करण्यात आली.
■ सर्वसामान्य व गोरगरीब लोकांचा या योजनेत समावेश करून घेण्यासाठीचा प्रयत्न केंद्र शासनाकडून केला जात आहे.
अटी काय?
■ हा विमा प्रत्येक राष्ट्रीय बँकेकडून काढला जाऊ शकतो. विमा काढण्यासाठी संबंधित बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
■ १ जून ते ३१ मे असा विमा योजनेचा कालावधी असतो. ऑफलाइन किंवा ऑनलाइन विमा काढता येतो.