नक्षलग्रस्त भागातील मतदान केंद्रावर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 23:55 IST2019-04-11T23:53:38+5:302019-04-11T23:55:35+5:30
नक्षलग्रस्त भागातील मतदार नक्षलवाद्यांच्या भीतीपोटी मतदान करण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र यापूर्वीच्या एक दोन निवडणुकीत होते. मात्र गुरूवारी (दि.११) लोकसभा निवडणुकी दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त आणि संवेदनशिल भागातील मतदान केंद्रावर मतदारांची मतदान करण्यासाठी मोठी गर्दी दिसून आली.

नक्षलग्रस्त भागातील मतदान केंद्रावर गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नक्षलग्रस्त भागातील मतदार नक्षलवाद्यांच्या भीतीपोटी मतदान करण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र यापूर्वीच्या एक दोन निवडणुकीत होते. मात्र गुरूवारी (दि.११) लोकसभा निवडणुकी दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त आणि संवेदनशिल भागातील मतदान केंद्रावर मतदारांची मतदान करण्यासाठी मोठी गर्दी दिसून आली.
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव-देवरी या मतदारसंघाचा गडचिरोली चिमूर मतदारसंघात समावेश आहे. या मतदार संघात एकूण २६ संवेदनशिल मतदान केंद्राचा समावेश आहे. तर अर्जुनी मोरगाव मतदारसंघात सुध्दा पाच ते सहा संवेदनशिल मतदान केंद्र आहे.त्यामुळेच या भागात सकाळी ७ वाजता ते दुपारी ३ वाजतापर्यंत मतदान घेण्यात आले. संवेदनशिल मतदान केंद्रामध्ये पिपरीया, दरेकसा, बिजेपार व पिपरीया,रामाटोला, हलबीटोला, गल्लाटोला, बाकलसर्रा, जांभळी, नवाटोला, धनेगाव, दरेकसा, जमाकुडो, वंजारी, टोयागोंदी, चांदसूरज, विचारपूर, कोपालगड, कोसमतर्रा, मानागड, मरकाखांदा, कुलरभट्टी, बिजेपार, पांढरवानी, डोमाटोला, लभाधरणी, गोर्रे, लोहारा, भर्रीटोला या केंद्राचा समावेश आहे.
देवरी तालुक्यातील घोनाडी, मंगेझरी, बीजटोला, सर्रेगाव, म्हैसुली ही मतदान केंद्र नक्षलग्रस्त भागात असल्याने गेल्या निवडणुकीत या गावातील नागरिक मतदान करण्यासाठी पुढे आले नव्हते. त्यामुळे चोख पोलीस बंदोबस्त ठेवून सुध्दा नागरिकांमध्ये भीती कायम होती. मात्र यावेळेच्या निवडणुकीत याचा पूर्णपणे अभाव दिसून येत होता. नक्षलग्रस्त भागातील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी मतदारांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
विशेष म्हणजे प्रथमच या भागातील मतदार स्वत:हून मतदानासाठी निर्भीडपणे पुढे येते होते. त्यामुळे सकाळी ११ वाजतापर्यंत भागातील मतदान केंद्रावर ३५ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे हळूहळू का होईना नक्षलग्रस्त भागातील मतदारांमध्ये नक्षलवाद्यांप्रती भीती कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.
पोलिसांची भूमिका महत्त्वपूर्ण
नक्षलग्रस्त भागातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी यंदा गावांमध्ये पोलीस विभागातर्फे मागील तीन महिन्यांपासून जनजागृती मोहीम राबविण्यात आली. तसेच गावागावात जाऊन पोलिसांनी नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करुन व त्यांच्यातील नक्षलवाद्यांची भीती दूर केली. त्यामुळेच यंदा मतदान करण्यासाठी नागरिक स्वत:हून पुढे येते होते.त्यामुळे या निवडणुकीत पोलीस विभागाची भूमिका महत्त्वपूर्ण दिसून आली.