ग्राहकांनो सावधान ! इलेक्ट्रॉनिक्स वजनकाटे तपासूनच करा खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 16:32 IST2025-04-07T16:31:31+5:302025-04-07T16:32:14+5:30
ग्राहकांची फसवणूक : तपासणीकडे वैधमापनशास्त्र विभागाचा कानाडोळा

Consumers beware! Check the electronics scales before purchasing.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : किराणा दुकान असो वा सोन्या-चांदीचे, इलेक्ट्रॉनिक काट्यामुळे फसवणूक होत नाही या भ्रमात तुम्ही असाल तर ते चुकीचे आहे. कारण अनेक दुकानदार इलेक्ट्रॉनिक वजन काट्याच्या मापात फेरफार करतात. इलेक्ट्रॉनिक काट्यांपैकी ५० टक्के काट्यांमध्ये दोष असून, त्याकडे वैधमापनशास्त्र विभागाचे अधिकारी कानाडोळा करीत असल्याचा ग्राहक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. साप्ताहिक बाजारात एक किलो भाजी घेतल्यास पाऊण किलोच मिळत असल्याचा अनुभव गृहिणींना येतो. वैधमापनशास्त्र विभागाचे अधिकारी तपासणीदरम्यान अर्थपूर्ण कारवाई करून विक्रेत्यांना सोडून देतात.
तक्रारीनंतरही अधिकारी कारवाई करीत नाहीत. त्यामुळे ग्राहकांची आर्थिक लूट होते. साप्ताहिक बाजारात खरेदी करणारे ग्राहकही वजनाकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे विक्रेत्यांचे फावते. अधिकाऱ्यांनी कमी वजन देणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कठोर कारवाई करावी, अशी मागणी अ.भा. ग्राहक पंचायतकडून केली जाते.
रिमोटद्वारे वजनात हेरफेर
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक कबाडी इलेक्ट्रॉनिक्स काटा घेऊन वस्त्यांमध्ये फिरून लोकांकडून भंगार खरेदी करत असल्याचे दिसत आहे. तो वजनात हेरफेर करीत असल्याचे स्थानिक लोकांच्या लक्षात येताच त्यांनी एका माणसाचे वजन व लोखंडी गेटचे वजन केले. कबाडी रिमोटद्वारे मूळ वजन कसे कमी करतो, याचे प्रात्यक्षिक व्हिडीओत दिसून येत आहे. तुमच्या दारात भंगार वा पेपर रद्दी विकत घेण्यासाठी आलेल्या कबाडीपासून सावधान राहण्याची गरज आहे. तुम्हाला बोलण्यात गुंतवून विकलेल्या वस्तूंचे वजन कबाडी अर्ध्यावर आणतो आणि वजनाचे पैसे देऊन लगेच निघून जातो. हा व्यवहार वैधमापनशास्त्र विभागांतर्गत येतो.
ग्राहकांची होतेय लूट
- बाजारात दूध, सीलबंद पाणी, बिस्किटे, शीतपेये छापील किमतीत विकण्याची सक्ती आहे. उन्हाळ्यात दुकानदार शीतपेय व पाणी थंड करण्याच्या नावाखाली अधिक शुल्क आकारतो. गॅस सिलिंडर घरी आणला जातो तेव्हा संबंधित गॅस एजन्सीला कंपनीने दिलेल्या वजन काट्यावर वजन करून दाखवण्याची सक्ती आहे. पण कधीही वजन होत नाही.
- नामांकित कंपन्यांची अनेक २ प्रकारची खाद्यपदार्थांची पाकिटे दुकानांवर मिळतात; परंतु या पाकिटांवर दिलेले वजन आणि पाकिटात असलेल्या खाद्यपदार्थाच्या वजनात तूट असल्याचा प्रकार अनेकदा दिसून येतो. आठवडी बाजारातही एक किलो भाजी पाऊण किलो मिळाल्याच्या तक्रारी असतात.