१२०० हेक्टरमधील नुकसानीचे पंचनामे पूर्ण; अतिवृष्टीमुळे नुकसान वाढीची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 16:07 IST2024-08-05T16:03:51+5:302024-08-05T16:07:03+5:30
Gondia : पंचनामे पूर्ण होण्यास लागणार वेळ

Complete panchnama of damage in 1200 hectares; Damage likely to increase due to heavy rains
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात मागील दहा-बारा दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन अर्जुनी मोरगाव, देवरी, गोंदिया, तिरोडा, सालेकसा तालुक्यातील धानपिक, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले. यानंतर कृषी विभागाने पंचनामे करण्यास सुरुवात केली असून, शनिवारपर्यंत १२०० हेक्टरमधील पिकांचे पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अजित अडसुळे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
जुलैत महिन्यात सलग बारा दिवस पाऊस झाला. काही तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊन हजारो हेक्टर शेती पाण्याखाली होती. पुरामुळे अनेक शेतकऱ्यांची केलेली रोवणी वाहून गेली. तर काही शेतकऱ्यांचे पन्हे आणि धान सडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी अनेक शेतकऱ्यांना खरीप हंगामापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने कृषी आणि महसूल विभागाच्या यंत्रणेला दिले होते.
कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात ३ हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान झाल्याचे पुढे आले होते. दरम्यान, कृषी विभागाने नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनामे करण्यास सुरुवात केली असून, आतापर्यंत १२०० हेक्टरमधील नुकसानीचे सर्वेक्षण पूर्ण झाले. गेल्या तीन दिवसांपासून पाऊस हजेरी लावत असल्याने नुकसानीचे पंचनामे करताना कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना अडचण जात आहे.
नुकसानीचा आकडा पाच हजार हेक्टरवर जाण्याची शक्यता
जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. त्यातच मोठ्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने पिकांच्या नुकसानीच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार नुकसानीचा आकडा पाच हेक्टरपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
शेतकरी म्हणतात आता पुरेसा झाला पाऊस
जिल्ह्यात दोन दिवस वगळता सलग पंधरा दिवसांपासून पाऊस सुरु आहे. अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने धान पिकांवर कीड रोगाची शक्यता बळावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली असून, आता पाऊस पुरेसा झाल्याचे सांगत आहे.