रस्त्याच्या मागणीसाठी धानोलीवासीयांचे चूल बंद आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 16:41 IST2024-09-10T16:39:58+5:302024-09-10T16:41:50+5:30
चार दिवसांपासून सुरू आहे उपोषण : शासन, प्रशासन दखल घेईना; गावकऱ्यांत रोष

Chool bandh protest of Dhanoli residents for road demand
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सालेकसा तालुक्यातील धानोली ते बाम्हणी या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. धानोली ते बाम्हणी हा ५ किमीचा रस्ता तयार करण्यात यावा यासाठी धानोली येथील गावकऱ्यांनी ५ सप्टेंबरपासून उपोषण सुरू केले आहे. पण शासन व प्रशासनाने त्यांच्या आंदोलनाची अद्यापही दखल न घेतल्याने सोमवारी (दि.९) येथील गावकऱ्यांनी चूलबंद आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
धानोली-बाम्हणी रस्ता निर्माण समिती स्थापन करून या समितीच्या माध्यमातून शासनाकडे रस्ता बांधकामासाठी वांरवार पाठपुरावा करण्यात आला. पण प्रशासनाने याची दखल न घेतल्याने धानोली येथील नवयुवक राहुल इंद्रसेनग बघेले, श्यामू सीताराम मेश्राम, होमेंद्र देवचंद कटरे, जितेंद्र भूमेश्वर टेंभरे, अक्षय जयचंद डोंगरे ५ सप्टेंबरपासून उपोषण सुरू केले. पण याची प्रशासनाने कुठलीच दखल घेतली नाही. त्यामुळे समस्त गावकऱ्यांनी सोमवारी (दि.९) चूलबंद आंदोलन करून आंदोलनस्थळी एकत्र येत युवकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. शनिवारी (दि.७) आ. सहषराम कोरोटे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली.
मात्र उपोषणकर्त्यांची समजूत काढण्यास व समस्या मार्गी लावण्यास त्यांना यश आले नाही. जोपर्यंत या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका युवकांनी घेतली आहे. तर युवकांच्या या उपोषणाला ग्रामपंचायत दरबडा, घोंसी, बोदलबोडी, पिपरटोला, गिरोला, नानव्हा, भजेपार, बाम्हणी, भजेपार, सोनारटोला या गावातील गावकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे.
पाच किमीच्या रस्त्यासाठी शासनाकडे निधी नाही का?
धानोली ते बाम्हणी रस्ता तयार करण्यात यावा याकरिता गेल्या ४० वर्षापासून गावकरी शासन आणि प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहे. पण शासनाने अद्यापही त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे गावकऱ्यांना उपोषण करण्याची वेळ आली. प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे विणले जात आहे. मग या पाच किमीच्या रस्त्यासाठीच शासनाकडे निधी नाही असा सवाल येथील गावकऱ्यांनी केला आहे.