मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, वयोश्री योजनेचा लाभासाठी शिबिर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 13:21 IST2024-07-24T13:18:52+5:302024-07-24T13:21:25+5:30
समाजकल्याण विभागाचा उपक्रम: दोन्ही योजनांचा घेता येणार लाभ

Camp for benefit of Chief Minister's Tirtha Darshan Yojana, Vayoshree Yojana
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना व मुख्यमंत्री वयोश्री योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी व योजनेचे अर्ज पात्र लाभार्थ्यांकडून भरून घेण्यासाठी २५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाचे मागे, पतंगा मैदान, गोंदिया येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे सहायक आयुक्त समाजकल्याण विनोद मोहतुरे यांनी कळविले आहे. सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जाऊन मनःशांती तसेच आध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी राज्यातील सर्वधर्मातील ज्येष्ठ नागरिक जे ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची, दर्शनाची संधी देण्यासाठी 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' राबविण्यास मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.
या योजनेंतर्गत निर्धारित केलेल्या स्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एकवेळ लाभ घेता येईल. प्रवास खर्चाची कमाल मर्यादा ३० हजार रुपये इतकी राहणार आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी व योजनेचे अर्ज पात्र लाभार्थ्यांकडून भरून घेण्यासाठी तसेच मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे अर्ज पात्र लाभार्थ्यांकडून भरून घेण्यासाठी २५ जुलैला शिबिर आयोजित केले आहे.
योजनेच्या लाभासाठी ही कागदपत्रे आवश्यक
लाभार्थ्यांचे वय ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे (वयाच्या पुराव्यासाठी टीसी/जन्म प्रमाणपत्र), लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जास्तीत जास्त २ लाख ५० हजार रुपये किंवा पिवळे, केशरी रेशनकार्ड असावे, शारीरि- कदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या निरोगी व प्रवासासाठी सक्षम असल्याचे आणि संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र नसल्यास १५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्मदाखला ग्राह्य धरण्यात येईल.
शिबिराला येताना ही कागदपत्रे आणा
शिबिरात येताना टीसी किंवा जन्म प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र, नावात बदल झाल्याचे शपथपत्र, उत्पन्नाचे स्वयंघोष- णापत्र, आधार कार्ड, बीपीएल, पिवळे, केशरी राशनकार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, बैंक खात्याशी आधार लिंक असल्याचे प्रमाणपत्र व तीन पासपोर्ट साईज फोटो इत्यादी कागदपत्र सोबत आणावे.